Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा - 2025 चे उद्घाटन

 सहसंपादक अनिल बोराडे 

धुळे - जलसंपदा विभागामार्फत राज्यात 15 ते 30 एप्रिल,2025 या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 चे  आयोजन करण्यात आले आहे. या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे धुळे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व आमदार राघवेंद्र भदाणे यांच्या हस्ते झाले.





 जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमास आमदार राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अधिक्षक अभियंता संदीप सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, कार्यकारी अभियंता पी.जी.पाटील, अमरदिप पाटील, एन.एम.व्हट्टे उपस्थित होते.


यावेळी उपस्थितशी संवाद साधताना आमदार राघवेंद्र पाटील म्हणाले की,

सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेमुळे सिंचन क्षेत्र वाढणार असून

शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठीच महायुती सरकारची काम करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकार स्थापन झाल्याबरोबर 100 दिवसाच्या कृति आराखड्याची संकल्पना मांडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज जल व्यवस्थापनाच पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनीही पाण्याला अतिशय महत्व दिले आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना निधी दिला असून त्यातून जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पुर्ण होत आहे. सुलवाडे जामफळ कनोली योजनेमुळे जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढणार आहेत. नार-पार सारखा 16 हजार कोटींचा प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्यातील 2 ते 3 टीएमसी पाणी जिल्ह्याला उपलब्ध होण्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांना केली आहे. या पंधरवड्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात जावून जलव्यवस्थापनाचे चांगले कामे व्हावे. ज्या गावात पाणीवाटप संस्था कार्यान्वित झाल्या  नसतील तेथे त्या स्थापन कराव्यात. वाडी शेवाडी, अक्कलपाडा भूसंपादनाच्या कामांना गती द्यावी. पाटचाऱ्या दुरुस्तीचे कामे करावीत. जलपंधरवड्यात प्रत्येक शेतक-यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेवून धुळे जिल्ह्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की , जल व्यवस्थापन पंधरवडा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाचा सक्रीय सहभाग असणे आवश्यक आहे. या जल व्यवस्थापन पंधरवड्यात सर्व शासकीय विभागांना सहभागी करुन घ्यावे, पाण्याशी संबंधित अनेक विभाग आहेत. कृषी, वन, जलसंधारण, महसुल, ग्रामविकास विभागांनी एकत्र येवून जलव्यवस्थापनासाठी चांगली कामे करावीत. जलसंपदेचे काम गावागावापर्यंत पोहचवावेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पाणी बचती विषयी जनजागृती करावी. पाणी बचतीचे व्हिडीओ तयार करुन ते  सोशल मीडियावर प्रसारीत करावे. पाण्याचा ताळेबंद मांडून पाण्याचा अनावश्यक वापर कमी करावा लागेल. पाणी बचतीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी लागेल. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर व सुयोग्य नियोजन आवश्यक आहेत. पाणी बचतीसाठी नागरिकांच्या सुचना संकल्पना स्वीकाराव्यात. शेतकरी, गावकरी यांना सहभागी करावे. जुने फंड इरिगेशन पद्धतीचे प्रकल्प पुर्नजिवित्त करावेत. वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण उपक्रम, नावीन्यपूर्ण कल्पना आपल्या जिल्ह्यामध्ये राबवून जलव्यस्थापन पंधरवडा यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकरांनी केले. 


पाणी बचतीचा मंत्र सर्वांनी अंगिकारावा असा संदेश धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिला, पाणी आणि जलव्यवस्थापन हा विषय केवळ जलसंधारण विभागापुरता मर्यादित राहिला नसून पाणी बचतीचा मंत्र सर्वांनी अंगिकारणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी त्यात सक्रीय सहभाग घेऊन कामे करावीत. पाणी बचतीचे महत्व विद्यार्थ्यांना शिकवावेत. पाणी टंचाईच्या झळा महिला वर्गाला जास्त होतात त्याचा महिला व बालकावर जसा परिणाम होतो तसाच तो स्वच्छतेवरही होतो. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणी बचत गट अशी संकल्पना सुरु करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जलव्यवस्थापन पंधरवड्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींल यंत्रणा पंधरवड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुरेपूर सहकार्य करेल असेही त्यांनी सांगितले.


 धुळे जिल्ह्यात 15  ते 30 एप्रिल दरम्यान जलव्यस्थापन कृती पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात 15 एप्रिल रोजी जल व्यवस्थापन कृती पंधरवडा शुभांरभ, 16 एप्रिल रोजी अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण, 17 एप्रिल रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण, 18 एप्रिल रोजी शेतकरी, पाणी वापर संस्था संवाद, 19 एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इत्यादीचे अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी, 20 एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान, 21 एप्रिल रोजी  उपसा सिंचनाचे पाणी परवानगी तक्रारींचे निरसन, 22 एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरण शोध आणि कार्यवाही, 23 एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धती बदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन बाबत बैठक, कार्यशाळा, 24 एप्रिल रोजी सिंचन ई प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकरणी व वसुली, थकीत पाणीपट्टी प्रकरणाचा आढावा, 25 एप्रिल रोजी विद्यापीठ, केव्हीके, सेवाभावी संस्था यांचे समवेत संवाद व कृती कार्यक्रम, 26 एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याबद्दल प्रकरणांचा शोध घेणे, 27 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 28 एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाचे नावे संपादित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे, अतिक्रमण निष्कासन दि. 31 मे पूर्वी पूर्ण करणे, 29 एप्रिल रोजी पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र, कार्यशाळा तसेच 30 एप्रिल रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालय कार्यशाळा, महिला मेळावा या पंधरवडा कालावधीत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार व पंधरवडा समारोप कार्यक्रम घेण्यात येणार आहे.


 प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील तापी, बुराई, अनेर, पांझरा, कान या पाच नद्यांचे कलशात आणलेल्या पाण्याचे मान्यवरांच्या हस्ते जलपुजन त्यानंतर जल बचतीची प्रतिज्ञा देण्यात आली.

Post a Comment

0 Comments