Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा समाजाने लाभ घ्यावा - जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ललित गांधी




 सहसंपादक अनिल बोराडे 

धुळे- जैन समाजाच्या सर्व घटकांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या  महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती समाजातील नागरिकांनी घेऊन त्यांचा लाभ घ्यावा. असे प्रतिपादन जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोग सदस्य ललित गांधी यांनी केले.


धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ललीत गांधी यांच्या अध्यक्षतेखाली भगवान महावीर जन्म कल्याणक 2550 महामहोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ तसेच आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा नियोजन अधिकारी छ. रा. कनगरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, श्री.चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष प्रमोद जैन, पदमप्रभू दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष भरत जैन, श्री.शांतीनाथजी दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष प्रविण ठोलीया, मांगीतुंगीचे उपाध्यक्ष ॲड. महेंद्रकुमार जैन, कविराज जैन, पवनभाई पाटणी, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यकारणी सदस्य फुलचंद जैन, किशोरभाई शाह, नवकार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनिल मुथा उपस्थित होते.


ललीत गांधी म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळात जैन समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनांचा समावेश केलेला आहे. त्यात व्यक्तिगत विकासासाठी, व्यापार उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या योजना, महिला बचतगटांना प्रोत्साहन योजना, महिलांना व्यापार उद्योगांमध्ये प्रोत्साहित करण्याच्या योजना, शिक्षणामध्ये उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशीप योजना अशा विविध योजनांचा या महामंडळाच्या कार्यकक्षेत समावेश केलेला आहे. 


याबरोबरच जैन धर्मियांच्या प्राचीन तीर्थक्षेत्रांचे संवर्धन, जीर्णोद्धार योजना या महामंडळामध्ये आहेत. तसेच प्राचीन जैन ग्रंथसंपदेच पुनर्लेखन करणे, तसेच जुन्या दस्तऐवजाचे डिजिटायझेजन करणे, जैन साधुसंतांच्या विहारांमध्ये सुरक्षा पुरवणे आणि त्यांच्या विहारांमध्ये ज्या ठिकाणी सुविधा नाहीत अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सुद्धा सरकारने महामंडळाच्या माध्यमातून दिली आहे. महामंडळाच्या माध्यमातून गृहकर्जाची, विधवा महिलांना पेन्शन देणे अशा प्रकारचे सर्व समावेशक तरतुदी असलेलं व जैन समाजाच्या सर्व घटकांचा विकास करता येईल अशा सर्व योजनांचा समावेश असलेलं महामंडळ राज्य सरकारने स्थापन केले आहे. या महामंडळाची माहिती प्रत्येक जिल्ह्यातील जैन समाजाच्या सर्व समाजापर्यत पोहचावावी, असे त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रविकास कार्यक्रमांत पायाभूत सुविधा विकसित करावी. प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारणीसाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करुन द्यावी. तसेच जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ तसेच राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या कार्यालयासाठी तसेच समाजभवन, ग्रंथालयासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. अल्पसंख्याक समिती गठीत करण्यात यावी. या समितीच्या वेळोवेळी बैठका घेण्यात याव्यात. जैन तीर्थक्षेत्र बळसाणे तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करावा. बळसाणे ते धुळे दरम्यान जैन साध्वीसाठी विहार धाम तयार करण्यासाठी योग्य जागेची निवड करावी. तीर्थक्षेत्र बळसाणेला ब वर्ग तीथक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. भगवान महावीर जयंतीच्या दिवशी मटन मार्केट बंद राहतील याची प्रशासनाने दखल घ्यावी. उघड्यावर मांस विक्री करणा-यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी आढावा बैठकीत दिल्यात.


यावेळी महाराष्ट्र शासनाने आयोजित भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते. या स्पर्धेत भगवान महावीर यांचे जीवन, सिद्धांत  व संदेश या विषयावर घेण्यात आलेल्या इयत्ता 5  ते 10 वी च्या दोन गटातील 10 विद्यार्थ्यांना धनादेश तसेच प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यावेळी मोठया संख्येने नागरिक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments