Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवापूर तालुक्यातील 255 आशा कार्यकर्त्यांना डिजिटल आरोग्य तपासणी किटचे वाटप



 भारत पेट्रोलियम आणि CARD च्या संयुक्त उपक्रमातून आरोग्य व्यवस्था बळकटीकरण


नवापूर, १८: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत, नवापूर तालुक्यातील 255 गावपातळीवरील आशा कार्यकर्त्यांना डिजिटल आरोग्य तपासणी किट वितरित करण्यात आले. या किटच्या मदतीने गरोदर माता, स्तनदा माता, नवजात अर्भक आणि लहान मुलांच्या आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवता येईल तसेच वेळेवर निदान करून आवश्यक उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात संदर्भित करता येईल.
आरोग्य विभाग,जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या विनंतीनुसार, सेंटर फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (CARD), जालना यांच्या माध्यमातून या किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये डिजिटल थर्मामीटर, डिजिटल बेबी वेटिंग स्केल, माता व मुलांसाठी वजन मोजण्याचे यंत्र, पल्स ऑक्सिमीटर, HBNC किट बॅगसह यांचा समावेश होता. बालमृत्यू कमी करण्याच्या कार्यात अहोरात्र झटणाऱ्या आशा कार्यकर्त्यांना या किटमुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम करता येणार आहे.
  वितरण समारंभाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र सोनवणे,तहसीलदार दत्ता जाधव,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती रजनीताई नाईक, सीएआरडी चे सचिव पुष्कराज तायडे, सहसचिव रघुनाथ शेवाळे, ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य मंगेश येवले, विस्तार अधिकारी के.बी.मोरे, आशा कार्यकर्त्या जिल्हा समन्वयक प्रसाद सोनार, तालुका समन्वयक श्रीमती शीतल भावसार आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
ही महत्वपूर्ण योजना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या दूरदृष्टी आणि पुढाकाराने आणि केंद्रीय अतिरिक्त सचिव प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. 
या उपक्रमात सीएआरडी संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे, सहसचिव रघुनाथ शेवाळे, कैलास खरात,महेश ढोकरे आणि अजिंक्य जाधव यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र सोनवणे यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे आभार मानले आणि त्यांच्या सहकार्याने नवापूर तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे व 255 आशा कार्यकर्त्यांसाठी डिजिटल आरोग्य तपासणी किट उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच, भविष्यातही असे सहकार्य मिळावे अशी विनंती केली.
  तर तहसीलदार दत्ता जाधव यांनी भारत पेट्रोलियम आणि सीएआरडी संस्थेच्या योगदानाचे कौतुक केले आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला यामुळे मोठा फायदा होईल असे मत व्यक्त केले.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीएआरडी चे सचिव पुष्कराज तायडे यांनी केले, तर अजिंक्य जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्ड अध्यक्ष प्रा.सुवर्णा दांडगे, उपाध्यक्ष प्रा.डॉ.रामदास निहाळ, कोषाध्यक्ष सोनियाताई तेलगड, संचालक ॲड. संतोष वानखेडे, श्रीमती सुनीता मगरे, मंगल रसाळ तसेच कर्मचारी नटवर वसावे, कु.आरती आहिरे, संजू सोनवणे आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

ग्रामीण आरोग्यासाठी CARDचा प्रभावी योगदान
“नवापूर तालुक्यातील २५५ आशा कार्यकर्त्यांना डिजिटल डायग्नोस्टिक हेल्थ स्क्रिनिंग किट्स प्रदान करण्यात CARD ला अत्यंत अभिमान वाटतो. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या CSR अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमामुळे प्राथमिक आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार असून, २५५ आशा कार्यकर्त्यांना मातृ आणि बाल आरोग्याच्या वेळेवर निदान व उपचारासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या पुढच्या टप्प्यात, ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (PHC) अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे जसे की OT Lamp, OT टेबल, डिलिव्हरी टेबल, ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉलीसह, स्ट्रेचर आणि इतर उपकरणे लवकरच प्रदान करण्यात येणार आहेत, ज्यामुळे आरोग्य सुविधा आणखी बळकट होतील.
जिल्हा परिषद, नंदुरबार तसेच सर्व मान्यवरांच्या अमूल्य सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. विशेषतः भारत पेट्रोलियमच्या ग्रामीण आरोग्य सेवेसाठी असलेल्या दृढ बांधिलकीबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. CARD आशा कार्यकर्त्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या शाश्वत उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत राहील.”
- श्री. पुष्कराज तायडे, सचिव
केंद्र कृषि व ग्रामीण विकास (CARD)

Post a Comment

0 Comments