Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पावसाच्या दडीने खरीप पिके संकटात; अटी-शर्तींशिवाय सरसकट आर्थिक मदतीसाठी शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक

 पिंपळनेर ( अनिल बोराडे - सहसंपादक):

खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असतानाच पावसाने दडी मारल्यामुळे पिंपळनेर परिसरातील बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप पिकांची वाढ खुंटली असून अनेक भागांत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत कोणत्याही अटी-शर्ती किंवा तांत्रिक निकषांचा अडसर न ठेवता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून थेट खात्यावर आर्थिक मदत जमा करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महसूल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पावसाने फिरवली पाठ; उत्पादनावर गंभीर परिणामाची भीती

पिंपळनेर व परिसरात शेतकऱ्यांनी मोठी कर्जबाजारीपणा पत्करून तसेच बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च करून खरीप पिके उभी केली होती. मात्र, ऐन ऐन मोक्याच्या क्षणी पावसाने पाठ फिरवल्याने पिके सुकू लागली आहेत. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

कागदोपत्री निकष बाजूला ठेवून बांधावर जाऊन पाहणी करा

अप्पर तहसील कार्यालयात महसूल प्रशासनाला निवेदन देताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. केवळ कागदोपत्री निकष, क्लिष्ट अटी-शर्ती किंवा तांत्रिक बाबींच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये, अशी आक्रमक भूमिका यावेळी घेण्यात आली.



प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी आणि एकाही शेतकऱ्याला न वगळता प्रत्येक शेताचा सरसकट पंचनामा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

'अटी-शर्ती कशाला?' — शेतकऱ्यांचा थेट सवाल

"नुकसान आमचे झाले आहे, मग मदतीसाठी शासनाकडून नको त्या अटी आणि शर्ती कशासाठी लादल्या जातात?" असा संतप्त सवाल याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारला. संकटसमयी शासनाने तातडीने निर्णय घेऊन मदतीची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

महसूल प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन शेतांवर प्रत्यक्ष पंचनाम्यांची कार्यवाही सुरू न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा देण्यात आला आहे. तसेच, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस महसूल प्रशासनच सर्वस्वी जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही निवेदनात देण्यात आला.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

निवेदन सादर करताना जिल्हा समन्वयक तथा रुग्णसेवक किशोर आप्पा वाघ, पिंपळनेर तालुका प्रमुख तुषार गवळी, तालुका समन्वयक नानू पगारे, शिक्षक सेनेचे अशोक सोनवणे सर, मयूर नांद्रे, युवासेनेचे चिंतामण ठाकरे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments