पिंपळनेर (सहसंपादक अनिल बोराडे):
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पिंपळनेर येथील राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलमध्ये उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची देशभक्तीपर भाषणे, प्रतिमापूजन आणि विचारपीठावरून दिलेल्या प्रेरणादायी संदेशांनी शाळेचा परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेला होता.
प्रतिमापूजन व मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे चेअरमन संभाजी अहिराव यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या प्रिन्सिपल सोनाली पाटील, प्रवेशक चव्हाण सर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या प्रभावी भाषणांनी कार्यक्रमात भरली रंगत
जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर आधारित अत्यंत प्रभावी भाषणे सादर केली. गांधीजींचे सत्य, अहिंसा, स्वच्छता, स्वावलंबन व साधेपणा आणि शास्त्रीजींची प्रामाणिकता, शिस्त, कर्तव्यनिष्ठा व देशसेवेची भावना विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांमधून मांडली. केवळ पुस्तकी ज्ञान न ठेवता राष्ट्रपुरुषांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी या वेळी व्यक्त केला.
‘जयंतीपुरते विचार नकोत; दैनंदिन आचरणात आणा’ — संभाजी अहिराव
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चेअरमन संभाजी अहिराव म्हणाले, "महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्याच्या लढ्यात एकत्रित केले, तर लालबहादूर शास्त्रींनी अत्यंत साधेपणाने जगत ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेतून देशाचे रक्षणकर्ते व अन्नदात्यांचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या विद्यार्थ्यांनी या महान नेत्यांकडून सत्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशप्रेमाची प्रेरणा घेतली पाहिजे. केवळ जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांचे विचार दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल."
इतिहासातून मूल्ये आत्मसात करा — प्रिन्सिपल सोनाली पाटील
प्रिन्सिपल सोनाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना देशाच्या इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या या दोन्ही महापुरुषांचे जीवनकार्य समजून घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या जीवनातील मूल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी देशाचे जबाबदार नागरिक म्हणून घडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नैतिक संस्कार अन् सामाजिक जबाबदारीची रुजवणूक
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या स्वच्छतेच्या संदेशासह शास्त्रीजींच्या शिस्त व कर्तव्यनिष्ठेची माहिती दिली. राजे छत्रपती स्कूलमध्ये गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांवर राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्यांचे संस्कार घडविण्यावर भर दिला जात असल्याचे या सोहळ्यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा जयंती सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्वा पार पडला.


Post a Comment
0 Comments