पिंपळनेर (सहसंपादक अनिल बोराडे):
जल, जंगल, जमीन आणि परंपरेशी नाळ जोडणाऱ्या जनजाती आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, धार्मिक परंपरा आणि श्रद्धास्थाने जपण्यासाठी समाजातील भगत, गुरु माता, पुजारी व महंतांनी संघटित होऊन पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र कन्हैयालाल महाराज मंदिर, आमळी (ता. साक्री/पिंपळनेर) येथे पिंपळनेर तालुक्यातील जनजाती आदिवासी समाजात धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक स्तरावर कार्य करणाऱ्या भगत, गुरु माता, पुजारी आणि महंतांचे भव्य संमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या संमेलनाला तालुक्यातील समाजबांधवांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
या संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले भातोजी संप्रदायाचे प्रचारक श्री. प्रताप महाराज वसावे (खापर) यांनी जनजाती आदिवासी समाजाच्या पारंपरिक जीवनपद्धतीचे, धार्मिक श्रद्धांचे आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व उपस्थित समाजबांधवांना पटवून दिले. ते म्हणाले की, आदिवासी समाजाने अनेक पिढ्यांपासून आपले सण-उत्सव, रूढी-परंपरा, देवदेवतांची उपासना आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते जपले आहे. पूर्वीच्या काळात औपचारिक शिक्षणाचे प्रमाण कमी असतानाही समाजाने आपल्या संस्कृतीचे आणि मूल्यांचे जतन केले असून, हाच समृद्ध वारसा आजही आदिवासी समाजाची खरी ओळख बनून उभा आहे. कुलदेवी देव मोगरा माता, वाघदेवतेची पूजा, तसेच जल, जंगल आणि निसर्गाशी जोडलेल्या श्रद्धा या समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. या परंपरा केवळ धार्मिक आस्था नसून त्या समाजाच्या अस्मितेचे, एकजुटीचे आणि पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या जीवनमूल्यांचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
धार्मिक व सामाजिक आव्हानांवर प्रकाश टाकताना प्रताप महाराज वसावे यांनी समाजात वाढत्या धर्मांतराच्या प्रसारावर तीव्र चिंता व्यक्त केली. समाजातील काही निष्पाप व्यक्तींना खोटी प्रलोभने दाखवून धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न होत असल्याने अशा परिस्थितीत समाजाने अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. आपल्या पारंपरिक उपासना पद्धती, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी गावोगावी जाऊन जनजागृती केली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. समाजातील धार्मिक मार्गदर्शकांनी नव्या पिढीला आपल्या वैभवशाली परंपरांची ओळख करून द्यावी आणि आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचे जतन करण्यासाठी सदैव सकारात्मक व सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
पिंपळनेर तालुक्यातील भगत, गुरु माता, पुजारी आणि महंत यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने आयोजित या संमेलनातून सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक संवर्धनाचा दृढ विचार पुढे आला. समाजातील पारंपरिक धार्मिक नेतृत्वाने परस्पर समन्वयातून काम केल्यास आदिवासी संस्कृतीचा वारसा अधिक सक्षमपणे पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येईल, यावर या प्रसंगी एकमत झाले. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री क्षेत्र कन्हैयालाल महाराज मंदिर ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभले.
आदिवासी समाजाची परंपरा हीच त्याची खरी ओळख, संस्कृती हीच त्याची ताकद आणि एकजूट हीच त्याच्या भविष्याची दिशा आहे, याच भावनेने संपन्न झालेल्या या संमेलनाने संपूर्ण परिसरात सांस्कृतिक जतन व समाजजागृतीची एक नवी चेतना निर्माण केली आहे.


Post a Comment
0 Comments