Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बासर पाझर तलावाच्या पाणीप्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक; अपर तहसीलदारांकडे धडक देऊन कारवाईची मागणी

 पिंपळनेर (जि. धुळे सहसंपादक अनिल बोराडे):

पिंपळनेर जवळील बासर पाझर तलावाच्या बुडीत क्षेत्रातील विहिरी आणि पंपांच्या पाणीउपशावरून ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुडीत क्षेत्रातील काही विहिरींचे पंप प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहेत, तर काही विहिरींचे पंप मात्र अद्याप सुरूच आहेत. या दुटप्पी धोरणामुळे एकाच परिसरात कारवाईचे वेगवेगळे निकष का लागू केले जात आहेत, असा संतप्त सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी अपर तहसीलदार, पिंपळनेर यांच्याकडे धडक देऊन पुनश्च निवेदन सादर केले. यापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या अर्जावर प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, याचा स्पष्ट लेखी अहवाल तातडीने सादर करावा आणि सर्व विहिरी-पंपांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



बासर पाझर तलावाचे बुडीत क्षेत्र हे परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे या पाण्याचे प्रदूषण रोखणे, अनधिकृत पाणीउपशावर बंदी घालणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. असे असतानाही बुडीत क्षेत्रातून काही ठिकाणी नियमबाह्य पाणीउपसा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने कोणत्याही व्यक्तीला विनाकारण त्रास न देता, भेदभावरहित धोरण स्वीकारावे. संपूर्ण बुडीत क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून कोणत्या विहिरींमधून उपसा होतोय, त्याला आवश्यक परवानग्या आहेत का, आणि पाण्याचा वापर नक्की कशासाठी होत आहे, याची सखोल चौकशी करावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.



या संपूर्ण प्रकरणाची तपासणी पूर्ण होईपर्यंत नियमबाह्य पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. कोणत्याही नागरिकावर अन्याय न करता सर्व नियम कायदेशीर तरतुदींनुसार सर्वांना समान रीतीने लागू व्हावेत, हाच ग्रामस्थांचा मुख्य उद्देश आहे. १६ ऑक्टोबरच्या अर्जावर आतापर्यंत झालेली कार्यवाही, तपासणी केलेल्या विहिरींची संख्या आणि आढळलेले उल्लंघन या सर्व बाबींची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असून केवळ आश्वासनांवर समाधान न मानता प्रत्यक्ष स्थळपाहणी व कायदेशीर निर्णय घेण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.

या निवेदनावर नितीन हिम्मत मोरे, अतुल सुभाष पवार, कैलास गुलाबराव पाटील, रमेश बळीराम पवार, देविदास सुभाष मोरे, योगेश्वर रमेश मोरे, सुनील रमेश नांद्रे, संजय वामन मोरे, महेंद्र वसैन, योगेश गोकुळ बोसे, अजिंक्य राजेंद्र नांद्रे, गोकुळ यादव मोरे, सर्जेराव काशिनाथ मोरे, दत्तू दिगंबर मोरे, सचिन हरिष भोरे, अविनाश दादाजी नोहे, अरुण लोटन मौ, कैलास दौलत बागले, वसंत धोंड मोरे, संजय रामदास पवार, सुभाष गोबजी नोहे, जमेरा मंदलाल मोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा थेट सार्वजनिक आरोग्याशी निगडित असल्याने प्रशासनाने यावर तातडीने निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments