धुळे (सहसंपादक अनिल बोराडे):
स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल परिसरात ४८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीतर्फे आयोजित १० दिवसीय विशेष निवासी शिबिरात सैनिकी शिस्त आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. १८ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान पार पडणाऱ्या या शिबिरात तब्बल ४०१ NCC कॅडेट्सनी ‘फायरिंग व वेपन ट्रेनिंग’च्या प्रत्यक्ष सत्रात सहभाग घेत अचूक लक्ष्यवेध साधला.
फायरिंग अन् वेपन ट्रेनिंगचा थरार
सत्रादरम्यान लष्करी अधिकारी व तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्सना रायफल हाताळणी, सुरक्षा नियम आणि अचूक नेमबाजीचे तंत्र शिकवण्यात आले. कॅडेट्सनी ‘लाइंग पोझिशन’मध्ये वाळूच्या पोत्यांचा आधार घेत शिस्तबद्ध पद्धतीने टार्गेटवर गोळीबाराचे प्रात्यक्षिक सादर केले. शस्त्रांचा आवाज आणि कॅडेट्सच्या एकाग्रतेमुळे क्रीडा संकुल परिसरात सैनिकी प्रशिक्षणाचा रोमांचकारी अनुभव निर्माण झाला होता.
सर्वंकष सैनिकी व व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण
या शिबिरात केवळ फायरिंगच नव्हे, तर ड्रिल, वेपन ट्रेनिंग, ऑब्स्टॅकल कोर्स आणि मॅप रिडिंग (नकाशा वाचन) यांसारख्या विविध सैनिकी विषयांचे धडे दिले जात आहेत. यासोबतच युवकांमध्ये शारीरिक क्षमता, मानसिक एकाग्रता, संघभावना, नेतृत्वगुण, राष्ट्रीय एकात्मता आणि व्यक्तिमत्त्व विकास रुजविण्यावर विशेष भर दिला जात आहे.
देशसेवेसाठी युवक घडविणारे व्यासपीठ: कर्नल संजयकुमार
४८ महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल संजयकुमार यांनी सांगिले की, "एनसीसीच्या खडतर आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणातून युवकांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना निर्माण होते. भारतीय सेना, नौदल व हवाई दलात करिअर करण्यासाठी आणि सक्षम नागरिक घडवण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते."
कडक सुरक्षा आणि लष्करी अधिकाऱ्यांचे नियोजन
संपूर्ण प्रशिक्षण सत्रे पूर्ण सुरक्षानिधिन आणि लष्करी नियमांचे पालन करून पार पाडली जात आहेत. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन अधिकारी कर्नल सुदीप मिश्रा, सुभेदार मेजर मोहम्मद ईकबाल, शिबिर प्रशिक्षण अधिकारी मेजर के. एम. बोरसे, लेफ्टनंट क्रांती पाटील, शिबिर क्वार्टर मास्टर फर्स्ट अधिकारी श्याम पाटील, प्रशिक्षण जेसीओ सुखदेव सिंग, बीएचएम सुरेंदर सिंग, हवालदार संजू, हवालदार अमोल क्षीरसागर यांच्यासह बटालियनचे अधिकारी, प्रशिक्षक आणि जवान अहोरात्र मेहनत घेत आहेत.
‘एकता आणि अनुशासन’ या ब्रीदवाक्याला जागून भविष्यातील जबाबदार, शिस्तप्रिय आणि राष्ट्रनिष्ठ नागरिक घडवण्याचा संदेश या शिबिराच्या माध्यमातून दिला जात आहे.


Post a Comment
0 Comments