नवापूर शहरातील धडधड्या परिसरातील रेल्वे गेटजवळील सार्वजनिक जागेवर पूर्ववैमनस्य आणि गैरसमजातून एका २४ वर्षीय चालकावर चाकूने हल्ला करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन संशयित आरोपींविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीनटेंबा येथील रहिवासी आणि व्यवसाय चालक असलेले कृणाल अर्जुन गोसावी (वय २४) हे १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास धडधड्या रेल्वे गेटजवळ सार्वजनिक जागेवर असताना, कमलेश उर्फ चिंटू सुभाष गोसावी, अक्षय बंजारा आणि विशाल सुभाष गोसावी (सर्व रा. धडधड्या) यांनी त्यांना अडवले.
कमलेश उर्फ चिंटू याने "तू माझा साला मयुर जय गोसावी व माझ्या भांडणात मध्ये का भाग घेतो?" असा सवाल करत शिवीगाळ केली. गैरसमजातून मनात राग धरून कमलेश याने सोबत आणलेल्या चाकूने कृणाल यांच्या उजव्या पायाच्या पोटरीवर वार करून दुखापत केली व पुन्हा अंगावर धावून जात वार करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान अक्षय बंजारा आणि विशाल गोसावी यांनी फिर्यादीला पकडून ठेवून हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेनंतर कृणाल गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीवरून १० ऑगस्ट रोजी रात्री २०:४१ वाजता आरोपींविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जितेंद्र सूर्यवंशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment
0 Comments