Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

धुळ्यात पद्मश्री डॉ. श्रीरंग लाड यांचा भव्य ‘पद्मश्री गौरव’ सत्कार; भारतीय किसान संघाचा पुढाकार

 पिंपळनेर (सहसंपादक अनिल बोराडे):

कृषी क्षेत्रातील अथांग ज्ञान, नवनवीन प्रयोगशीलता आणि शेतकरी कल्याणासाठी अविरत चाललेल्या कार्यातून देशात आपला वेगळा ठसा उमटविणारे पद्मश्री डॉ. श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) यांचा भारतीय किसान संघ, धुळे जिल्ह्याच्या वतीने भव्य ‘पद्मश्री गौरव सत्कार समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानाचा गौरव करण्यासाठी हा सोहळा शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी धुळे शहरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.



शेतकरीहिताच्या कार्याला मानाचा मुजरा

कृषी क्षेत्रातील उल्लेखनिीय कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने डॉ. श्रीरंग लाड यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या या राष्ट्रीय बहुमानामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, कृषी क्षेत्रातील अभ्यासक, कार्यकर्ते आणि ग्रामीण समाजाची मान उंचावली आहे. त्यांच्या या उत्तुंग कर्तृत्वाचा यथोचित सन्मान करण्यासाठी भारतीय किसान संघाने धुळे येथे विशेष सोहळ्याचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण

हा भव्य सत्कार सोहळा शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत धुळे शहरातील श्री शंकरराव देव सभागृह (बँक ऑफ बडोदाच्या मागे, मालेगाव रोड, धुळे) येथे रंगणार आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याने उपस्थितांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी धुळ्याचे निवृत्त जिल्हा कृषी अधिकारी मा. सितारामजी चौधरी असणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रांत मंत्री मा. सुभाष राजाराम महाजन उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम भारतीय किसान संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष श्री. साहेबराव जैन (भाऊसाहेब जैन) यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजनाखाली पार पडत आहे. याप्रसंगी जिल्हा मंत्री दत्तूमाळ माळी, जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा सहमंत्री प्रा. डॉ. सुरेश अहिरे, जिल्हा महिला प्रमुख जयश्रीताई सोनवणे यांच्यासह साक्री, धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

"पद्मश्री डॉ. श्रीरंग लाड यांचा गौरव हा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण कृषी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. त्यांच्या कार्यातून नवोदित शेतकऱ्यांना मोठी प्रेरणा मिळत आहे," अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. 'शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध' या विचाराला बळ देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, कृषीप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन भारतीय किसान संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments