सहसंपादक अनिल बोराडे विशेष वृतांत
साक्री : वाकीगाव, ता. साक्री येथील शिवारात शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि नामदेव सहारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवली असता तिचे नाव सुनंदा गोट चौधरी (वय 40, रा. वाकी, ता. साक्री) असे असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केली असता, तिचा पती गोट गनसाराम चौधरी (वय 46, रा. वाकी, ता. साक्री) याने दि. 09 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास वाकी गावाच्या शिवारातील शेतात पत्नी सुनंदा चौधरी हिच्यासोबत शेताच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिचा जीव घेतल्याची माहिती समोर आली.
घटनेनंतर पिंपळनेर पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. अवघ्या दोन तासांत संशयित गोट गनसाराम चौधरी याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने पत्नी सुनंदा चौधरी हिचा खून केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात भाग-5, गु.र.नं. 190/2026, BNS कलम 103 (1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि नामदेव सहारे व त्यांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या दोन तासांत खुनाचा छडा लावल्याने पिंपळनेर पोलिसांच्या तत्पर तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Post a Comment
0 Comments