Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डॉक्टरांच्या हातून शेतात ‘आम्रक्रांती’! सुकापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बहिरम यांचा अनुकरणीय पुढाकार

 * २५ हजार फळझाडांच्या महाअभियानाला साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दमदार प्रतिसाद

 आरोग्यसेवेसोबत पर्यावरण संवर्धन अन् शाश्वत उत्पन्नाचा संकल्प

पिंपळनेर (सहसंपादक अनिल बोराडे):

शेतकऱ्यांच्या हाताला केवळ पारंपरिक पिकांची मशागत न देता, भविष्यातील शाश्वत उत्पन्नाची हिरवी आशा देणारा फळबाग लागवडीचा उपक्रम साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वेगाने आकारास येत आहे. देवगिरी कल्याण आश्रमाच्या विशेष प्रयत्नातून, 'सेवारथ' (जळगाव) व 'म्हाडा' यांच्या सहयोगाने तसेच वनवासी विकास प्रतिष्ठान (पिंपळनेर) यांच्या माध्यमातून २३ जुलै रोजी बारीपाडा येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून सुमारे २ हजार शेतकऱ्यांना २७ हजार फळझाडांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम आता प्रत्यक्ष शेतशिवारात दिसू लागले असून, शेतकरी अत्यंत उत्साहाने आपल्या शेतात व बांधावर फळझाडांची लागवड करत आहेत.



वैद्यकीय सेवेसोबत हरित क्रांतीची पेरणी

या महाअभियानाला अधिक प्रेरणादायी दिशा देत सुकापूर (ता. साक्री) येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी तथा जनरल सर्जन डॉ. संजय बहिरम यांनी स्वतःच्या शेतात आम्रवृक्षांची लागवड केली आहे. रुग्णालयात दिवसरात्र आरोग्यसेवा पुरवणाऱ्या एका जबाबदार डॉक्टराने स्वतः शेतात उतरून वृक्षारोपण केल्याने, परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमधून त्यांच्या या कृतीचे विशेष कौतुक होत आहे. "सेवा केवळ रुग्णालयापुरती मर्यादित नसून निसर्गाचे रक्षण करणे हीदेखील मोठी समाजसेवाच आहे," असा संदेश डॉ. बहिरम यांनी यातून दिला आहे.

शाश्वत उत्पन्नाचा 'नैसर्गिक' आधार

पावसाची अनिश्चितता, बदलते हवामान आणि शेतीचा वाढता उत्पादन खर्च यावर मात करण्यासाठी फळबाग लागवड हा एक उत्तम दीर्घकालीन पर्याय ठरत आहे. याच दूरदृष्टीने डॉ. बहिरम यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आंबा, पेरू, चिकू आणि जांभूळ यांसारख्या फळझाडांच्या लागवडीवर भर दिला आहे. उमेश देशमुख व पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते मिळालेल्या रोपांची प्रत्यक्ष लागवड करून सुकापूर परिसरात एक नवी चळवळ उभी राहिली आहे.



डॉ. संजय बहिरम यांच्यासोबतच विक्रम गांगुर्डे (म्हाळ्यापाडा), चौधरी (सुकापूर), मुरलीधर चौरे, सुनील चौरे (शेवडीपाडा) आणि पांडू बहिरम (सुकापूर) या शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात फळबाग फुलवण्याचा निर्धार केला आहे.

ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा

२७ हजार रोपांचे हे वितरण केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित नसून ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणाला आणि पर्यावरणाला संजीवनी देणारा प्रकल्प ठरणार आहे. या झाडांमुळे आगामी काळात जमिनीची धूप थांबून सुपीकता वाढेल, जैवविविधतेचे रक्षण होईल आणि भविष्यात फळपाल्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा व रोजगाराचा कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध होईल.

बारीपाड्यातून सुरू झालेली ही फळझाडांची हिरवी चळवळ आता साक्रीच्या पश्चिम पट्ट्यातील शेतशिवारात पोहोचली असून, ‘एक शेतकरी—अनेक झाडे’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाला समृद्ध आणि स्वावलंबी बनवण्यासाठी नांदी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments