सहसंपादक अनिल बोराडे
धुळे, दि. १७ जुलै : गरम व तेलकट खाद्यपदार्थ छापील न्यूजपेपरमध्ये देणे हे ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धुळे शहरात शुक्रवारी (दि. १७) विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान अनेक खाद्य व्यावसायिकांकडे छापील वृत्तपत्रांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले असून संबंधितांना तात्काळ हा प्रकार बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्यभर छापील न्यूजपेपरमध्ये गरम किंवा तेलकट खाद्यपदार्थ देण्यास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती व अंमलबजावणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत धुळे शहरात विविध भागांमध्ये तपासणी करण्यात आली.
प्रशासनाच्या माहितीनुसार, छापील वृत्तपत्रांवर वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये शिसे (Lead), कॅडमियम (Cadmium) तसेच मिनरल ऑइलसारखे हानिकारक रासायनिक घटक असू शकतात. गरम किंवा तेलकट पदार्थांचा या शाईशी संपर्क आल्यास हे घटक अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता असून त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
अन्न सुरक्षा आणि मानके (पॅकेजिंग) नियम, २०१८ नुसार गरम अथवा तेलकट खाद्यपदार्थ थेट छापील कागदात ठेवणे किंवा गुंडाळून देणे प्रतिबंधित आहे. त्यामुळे सर्व खाद्य व्यावसायिकांनी बटर पेपर, फूड-ग्रेड न छापलेला कागद, पेपर प्लेट, खाकी कागदी पाकीट, पांढरे फूड-ग्रेड पाकीट किंवा इतर सुरक्षित पॅकेजिंग साहित्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
यावेळी नागरिकांनाही छापील न्यूजपेपरमध्ये दिलेले खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत आणि सुरक्षित पॅकेजिंगचा आग्रह धरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित अन्न ही प्रत्येक नागरिकाची गरज असून सुरक्षित पॅकेजिंगची जबाबदारी प्रत्येक खाद्य व्यावसायिकाने पार पाडणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
धुळे शहरातील साक्री रोड, वाडीभोकर रोड तसेच देवपूर दत्त मंदिर परिसरात झालेल्या तपासणीदरम्यान काही खाद्य व्यावसायिकांकडून छापील न्यूजपेपरचा वापर होत असल्याचे आढळले. संबंधितांना तात्काळ सूचना देण्यात आल्या असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी प्रकरणे दाखल करण्यात येणार आहेत.
या विशेष मोहिमेत सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार तसेच शशिकांत राणे आणि अरविंद राऊत यांनी सहभाग घेतला.


Post a Comment
0 Comments