Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कृषी पत्रकारितेचा मानबिंदू! भिलाजी जिरे यांना प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक कृषी पत्रकार पुरस्कार'

 सहसंपादक अनिल बोराडे 

आदिवासी भागातील शेती, जलसंधारण आणि ग्रामीण विकासाच्या यशोगाथांना राज्यासह देशभर पोहोचविणाऱ्या 'दैनिक सकाळ'चे ज्येष्ठ पत्रकार भिलाजी जिरे यांचा मुंबईत भव्य सन्मान करण्यात आला असून कृषी आणि विकास पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली तब्बल २७ वर्षे निष्ठा, अभ्यास आणि सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी भागातील परिवर्तनाच्या कथा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणारे 'दैनिक सकाळ'चे ज्येष्ठ पत्रकार भिलाजी दिगंबर जिरे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक कृषी पत्रकार पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला असून कृषी पत्रकारितेतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा हा सन्मान संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.



हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला असून उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र बारवाले, अविनाश नाईक, दीपक पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून यावेळी उपस्थितांनी भिलाजी जिरे यांच्या ग्रामीण विकासाभिमुख पत्रकारितेचे आणि शेतकरी हितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे विशेष कौतुक केले आहे. भिलाजी जिरे यांनी २१ एप्रिल १९९८ पासून 'दैनिक सकाळ'च्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या दुर्गम व आदिवासी पश्चिम पट्ट्यातील कृषी, जलसंधारण, आधुनिक शेती, वनसंपत्तीवर आधारित रोजगार, शाश्वत विकास आणि ग्रामीण परिवर्तन यांसारख्या विषयांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन केले असून त्यांच्या संवेदनशील लेखणीने दुर्गम भागातील शेतकरी, महिला बचतगट, आदिवासी समाज आणि नवउद्योजकांच्या संघर्ष व यशाच्या कथा राज्यासह देशभर पोहोचवल्या आहेत.

त्यांच्या या सकारात्मक वार्तांकनामुळे झुकिनी, स्ट्रॉबेरी, स्मार्ट फार्मिंगद्वारे मक्याचे विक्रमी उत्पादन, लुपिन फाउंडेशनची जलक्रांती, सगुणा राईस टेक्नॉलॉजी म्हणजेच एसआरटी, पंतप्रधान वनधन योजना, शबरी ब्रेड, रासायनिकमुक्त गावरान गूळ उद्योग, मशरूम शेती यांसारख्या अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी मिळाली असून त्यांच्या बातम्यांनी अनेक शेतकऱ्यांना नवे प्रयोग करण्याची प्रेरणा दिली आणि ग्रामीण विकासाच्या चळवळीला मोठे बळ मिळाले आहे. एम.ए. व बी.एड. शारीरिक शिक्षण पदवीधारक भिलाजी जिरे हे कुडाशी तालुका साक्री जिल्हा धुळे येथील रहिवासी असून आदिवासी भागातील नैसर्गिक संसाधनांवर आधारित रोजगार, पर्यावरणपूरक शेती आणि शाश्वत ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेले पत्रकारितेचे योगदान राज्यभर आदर्श मानले जात आहे.



या गौरवशाली आणि प्रेरणादायी पुरस्कार सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप, चंद्रकांत घरटे, अनिल बोराडे, रमेश इंगळे, योगेश रायते, मोहित जिरे, संगीता जिरे, आशाताई इंगळे, पल्लवी जिरे, भाग्यश्री जिरे, जयश्री रायते, वैभवी घरटे, धन्वी जाधव, पलाक्षी जिरे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेती, पाणी, पर्यावरण आणि आदिवासी विकास या विषयांना केंद्रस्थानी ठेवून पत्रकारितेला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनविणाऱ्या भिलाजी जिरे यांनी आपल्या लेखणीतून ग्रामीण विकासाचा नवा इतिहास घडविला असून त्यांना मिळालेला 'वसंतराव नाईक कृषी पत्रकार पुरस्कार' हा केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा सन्मान नसून ग्रामीण आणि कृषी पत्रकारितेच्या मूल्यांचा गौरव असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली असून हा पुरस्कार उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारिता आणि शेतकरी समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे.


Post a Comment

0 Comments