Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पावसाळ्यापूर्वी जलशुद्धीकरण केंद्राची नगराध्यक्षा डॉ. योगिताताई चौरे यांची धडक पाहणी; स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

 पिंपळनेर | सहसंपादक अनिल बोराडे 


आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पिंपळनेर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण (फिल्टरेशन) केंद्राची नगराध्यक्षा डॉ. योगिताताई जितेश चौरे यांनी आज संबंधित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला.



या पाहणीदरम्यान जलशुद्धीकरण प्रक्रियेत वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, व्हॉल्व्ह प्रणाली, फिल्टरेशन टाक्या, पाणी साठवण व्यवस्था तसेच पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणींची बारकाईने तपासणी करण्यात आली. केंद्रातील विविध विभागांना भेट देऊन यंत्रणेची कार्यक्षमता, स्वच्छता आणि देखभाल यांची माहिती घेण्यात आली.


नगराध्यक्षा डॉ. योगिताताई चौरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक दुरुस्ती, देखभाल आणि तांत्रिक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळ्याच्या काळात कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड होऊ नये तसेच नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा मिळावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.



यावेळी नगराध्यक्षा डॉ. चौरे म्हणाल्या, "पिंपळनेरकरांना दर्जेदार, स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची सर्वोच्च जबाबदारी आहे. पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवाव्यात. आवश्यक दुरुस्ती आणि देखभाल कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी."


पाहणीवेळी उपनगराध्यक्ष योगेशजी नेरकर, पाणीपुरवठा सभापती डॉ. विनोद कोठावदे,,बांधकाम सभापती सतीश शिरसाठ, आरोग्य सभापती डॉ प्रशांत बागुल मुख्याधिकारी दीपक पाटील, तेजस लाडे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही जलशुद्धीकरण केंद्राची नियमित तपासणी, स्वच्छता आणि देखभाल यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या.



नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत, पावसाळ्यातील संभाव्य आव्हानांचा सामना करण्यासाठी नगरपरिषदेने सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि परिणामकारक करण्यासाठी आवश्यक त्या सर्व तांत्रिक व प्रशासकीय बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


ठळक मुद्दे :

• जलशुद्धीकरण केंद्राची नगराध्यक्षा डॉ. योगिताताई चौरे यांची प्रत्यक्ष पाहणी

• पावसाळ्यापूर्वी यंत्रणा, टाक्या व पाणी साठवण व्यवस्थेची सखोल तपासणी

• तातडीच्या दुरुस्ती व देखभाल कामांचे आदेश

• नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व नियमित पाणीपुरवठ्याला प्राधान्य


Post a Comment

0 Comments