पिंपळनेर (सहसंपादक अनिल बोराडे):
पिंपळनेर नगरपरिषदेच्या वार्ड क्रमांक २ मधील निवडणुकीच्या रणधुमाळीत अत्यंत मोठी आणि महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड समोर आली आहे. या वार्डातील अपक्ष उमेदवार सौ. वंदनाताई खरे यांनी निवडणुकीतून माघार घेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ. वसिमा आबीद शेख आणि श्री. दिलीप निळकंठ चौरे यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. या धक्कादायक आणि मोठ्या निर्णयामुळे वार्डातील निवडणुकीची संपूर्ण राजकीय समीकरणे बदलली असून शिवसेना उमेदवारांची स्थिती अत्यंत भक्कम झाली आहे. या घडामोडीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपक्ष उमेदवार सौ. वंदनाताई खरे यांनी या संदर्भात एक अधिकृत पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी आपल्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली आहे. वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि प्रलंबित राहिलेल्या विविध विकासकामांना गती देण्यासाठीच आपण शिवसेना उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि वार्डाचा कायापालट करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असून, त्यासाठी शिवसेना उमेदवारांना विजयी करणे काळाची गरज असल्याचे सौ. खरे यांनी नमूद केले आहे. पिंपळनेर शहरात विविध विकासकामे राबविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून सध्या अनेक कामे प्रगतीपथावर आहेत, या विश्वासातूनच आपण हा निर्णय घेतल्याचे सांगत वार्ड क्रमांक २ मधील तमाम मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मोठ्या संख्येने मतदान करून शिवसेना उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे जाहीर आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ. वसिमा आबीद शेख आणि श्री. दिलीप निळकंठ चौरे यांनी अपक्ष उमेदवार सौ. वंदनाताई खरे यांनी दिलेल्या या जाहीर पाठिंब्याचे अत्यंत उत्साहात स्वागत केले आहे. सौ. खरे यांनी दिलेला हा पाठिंबा म्हणजे केवळ राजकीय तडजोड नसून, हा शिवसेनेच्या विकासाच्या विचारांवर आणि ध्येयधोरणांवर जनतेने व्यक्त केलेला मोठा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली आहे. भविष्यात सर्व समाजघटकांना सोबत घेऊन आणि वार्डातील प्रत्येक नागरिकाला न्याय देत विकासाचे राजकारण करू, तसेच वार्डाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे आणि गतीने कार्य करू, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
या संपूर्ण घडामोडीवर राजकीय जाणकारांनी आपले मत व्यक्त केले असून, सौ. वंदनाताई खरे यांच्या या निर्णयामुळे वार्ड क्रमांक २ मधील निवडणुकीत शिवसेना उमेदवारांचे पारडे कमालीचे जड झाले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अपक्ष उमेदवाराने घेतलेल्या या भूमिकेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून निवडणुकीच्या रणधुमाळीत एक नवे आणि विजयाचे समीकरण निर्माण झाले आहे. "विकासासाठी एकत्र... शिवसेनेच्या विजयासाठी सज्ज!" असा निर्धार या निमित्ताने व्यक्त होत असून, हे महत्त्वपूर्ण पत्रक पिंपळनेर नगरपरिषदेचे नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख गणेश प्रकाश खैरनार यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Post a Comment
0 Comments