Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेर शहरातील दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; तात्काळ उपाययोजना न झाल्यास शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

 सहसंपादक अनिल बोराडे 

पिंपळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ०५ आणि ०६ मधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, दूषित आणि अस्वच्छ पाणीपुरवठा केला जात असल्याने स्थानिक जनतेमध्ये पिंपळनेर नगरपरिषद प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पिण्याच्या पाण्याऐवजी थेट अस्वच्छ पाणी नळांमधून येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक रोगाच्या विळख्यात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्वच्छ पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आणि जगण्याचा अधिकार असताना, पिंपळनेर नगरपरिषदेकडून मात्र लोकांच्या थेट आयुष्याशीच खेळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.



या प्रकरणातील सर्वात मर्मभेदी आणि संतापजनक बाब म्हणजे, प्रभाग क्र. ०६ हा स्वतः पिंपळनेर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापतींचा तर प्रभाग क्र. ०५ हा स्वच्छता व आरोग्य सभापतींचा हक्काचा प्रभाग आहे. ज्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर संपूर्ण पिंपळनेर शहराला शुद्ध पाणी आणि उत्तम आरोग्य देण्याची जबाबदारी मतदारांनी सोपवली, नेमक्या त्यांच्याच घरात म्हणजे त्यांच्याच प्रभागात नागरिक दूषित पाणी पिण्यास हतबल झाले आहेत. लोकप्रतिनिधींच्या या उदासीनतेमुळे "दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण" अशी अवस्था निर्माण झाली असून, जर स्वतः सभापतींच्याच प्रभागाची ही दुर्दशा असेल, तर संपूर्ण शहरात पिंपळनेर नगरपरिषदेचा कारभार कसा चालत असेल, याची मर्मभेदी कल्पना कोणालाही सहज करता येईल.

काही दिवसांपूर्वीच पिंपळनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा सभापती यांनी पिंपळनेर जलशुद्धीकरण केंद्राची मोठी गाजावाजा करत पाहणी केली होती आणि लवकरच परिस्थिती सुधारू असे आश्वासनही दिले होते. मात्र, जनतेला दिलेली ही आश्वासने नेहमीप्रमाणे केवळ कागदी घोडे ठरल्याचे आज स्पष्ट दिसत आहे. आजही नागरिकांच्या नळाला गढूळ पाणी येत असल्याने पिंपळनेर नगरपरिषदेच्या केवळ पाहणी दौऱ्यांवर आणि त्यांच्या हेतूवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करून आणि संताप व्यक्त करूनही पिंपळनेर नगरपरिषद प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

या गंभीर समस्येवर नगरसेवक विजय साहेबराव गांगुर्डे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत पिंपळनेर नगरपरिषद प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. प्रभाग क्र. ०५ व ०६ मधील दूषित पाणीपुरवठ्याची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता त्यांच्या आरोग्याशी चाललेला हा जीवघेणा खेळ थांबवावा, असे गांगुर्डे यांनी ठणकावून सांगितले आहे. तसेच पिंपळनेर नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन शिवसेनेतर्फे पिंपळनेर नगरपरिषदे विरोधात तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

या प्रकरणी शिवसेनेने पिंपळनेर नगरपरिषद प्रशासनासमोर मुख्य मागण्या मांडल्या असून, प्रभाग क्र. ०५ व ०६ मधील दूषित पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात यावा आणि जलशुद्धीकरण केंद्राची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासोबतच पिंपळनेर नगरपरिषदेने पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून त्याचा अहवाल जाहीर करावा आणि नागरिकांना नियमित तसेच स्वच्छ पाणीपुरवठ्याची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अबालवृद्धांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ आता पिंपळनेरकर सहन करणार नसून, या इशाऱ्यानंतर पिंपळनेर नगरपरिषद प्रशासन आपली सुस्त भूमिका बदलून खडबडून जागे होणार की शिवसेनेला आंदोलनाचे अस्त्र उपसावे लागणार, याकडे पिंपळनेरकरांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments