सहसंपादक अनिल बोराडे
मालेगाव तालुक्यातील प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र चंदनपुरी येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवास आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषाने आणि भंडार-खोबऱ्याच्या उधळणीने संपूर्ण चंदनपुरी नगरी भक्तीमय झाली आहे.
मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शासकीय महापूजा
यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे आणि सौ. अनितामाई भुसे यांच्या शुभहस्ते श्री खंडेराव महाराज मंदिरात विधिवत महापूजा करण्यात आली. यावेळी मंत्री भुसे यांनी श्री चरणी नतमस्तक होऊन राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
मशाल ज्योत आणि पालखी सोहळ्याचे आकर्षण
दरवर्षीप्रमाणे पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर या यात्रेस सुरुवात होते. शुक्रवारी जेजुरी गडावरून पायी आणलेली मशाल ज्योत चंदनपुरीत दाखल झाली. आज सकाळी या ज्योतीसह भगवान खंडोबा, म्हाळसाआई आणि बनाईमाता यांच्या मुखवट्यांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते.
भक्तांची मांदियाळी
राज्यभरातील मल्हार भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. याप्रसंगी गावचे सरपंच, शिवसेना पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "येळकोट येळकोट जय मल्हार"च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला असून, संपूर्ण चंदनपुरी नगरीत चैतन्याचे वातावरण आहे.



Post a Comment
0 Comments