सहसंपादक अनिल बोराडे
धुळे - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ३ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन (International Day of Persons with Disabilities) जगभर साजरा करण्यात येत आहे. २०25 या वर्षाची थीम "सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग-सर्वसमावेशक समाज घडविणे" अशी असून, या निमित्ताने धुळे जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागातर्फे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा शुभारंभ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या भव्य जनजागृती रॅलीने करण्यात आला.
रॅलीचा शुभारंभ
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश इंगळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. यावेळी धुळे जिल्हा विधी प्राधिकरणाचे मुख्य अभिरक्षक अॅड. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, दिव्यांग कल्याण अधिकारी श्री. मानसिंग पावरा, तसेच सहाय्यक लोक अभिरक्षक ऍड. रमीज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
महत्त्वाची प्रतिपादने
याप्रसंगी बोलताना धुळे जिल्हा विधी प्राधिकरणाचे मुख्य अभिरक्षक अॅड. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांबाबत महत्त्वाचे मत व्यक्त केले. ते म्हणाले,
> “दिव्यांग हे समाजाचे महत्त्वपूर्ण घटक असून त्यांच्या प्रगतीसाठी सर्वांनी संवेदनशील होणे गरजेचे आहे. त्यांना संधी आणि समान हक्क मिळणे हेच खरे सामाजिक विकासाचे लक्षण आहे.”
>
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश इंगळे यांनी देखील आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले,
> “दिव्यांग युवक-युवती स्वावलंबी व्हावेत यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण, विकासकेंद्रित योजना व उपक्रम राबविले जात आहेत. समाजमन दिव्यांगांसोबत उभे राहिले तर त्यांच्या आयुष्यातील संघर्ष कमी होईल.”
>
जनजागृतीपर घोषवाक्ये
या रॅलीत दिव्यांग विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. त्यांनी हातात संदेशयुक्त फलक घेऊन आणि घोषणा देत समाजामध्ये जागरूकता निर्माण केली. या घोषणांमध्ये "दिव्यांगांना दया नको, संधी द्या", "हातात हात द्या दिव्यांगांना साथ द्या", "दिव्यांगांची क्षमता ओळखा", "उठ दिव्यांग जागा हो", "दिव्यांग व्यक्ती समाजाचा अविभाज्य भाग, त्यांना देऊया समान संधी आणि आधार", "तुमचा आमचा एकच नारा, दिव्यांगांना देऊ सहारा", "नको बोल सहानुभूतीचे, शिक्षण द्या दिव्यांगांना हक्काचे" आणि "समाजाला जागवूया, दिव्यांगांना सक्षम बनवूया" यांसारख्या प्रभावी संदेशांचा समावेश होता.
रॅलीचा मार्ग
जनजागृती रॅलीचा शुभारंभ धुळे जिल्हा परिषदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून करण्यात आला. त्यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, जिजामाता शाळा, झाशीची राणी चौक, नवो महानगरपालिका, सिव्हील हॉस्पिटल मार्गे पुन्हा जिल्हा परिषदेत येऊन तिचा समारोप झाला.



Post a Comment
0 Comments