सहसंपादक अनिल बोराडे
साक्री (जि. धुळे) पोलिसांनी अवघ्या १२ तासांत एका घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत एक धक्कादायक सत्य उघड केले आहे. विशेष म्हणजे, ही घरफोडी बाहेरच्या चोरट्यांनी नव्हे, तर खुद्द तक्रारदार भावेश संजय नेरकर यानेच आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तक्रारदारासह एकूण ४ आरोपींना अटक केली असून, तब्बल रु. १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
🏠 काय आहे संपूर्ण प्रकरण?
दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०६:०० ते ०७:०० वाजेच्या दरम्यान, तक्रारदार भावेश संजय नेरकर (वय-२०, रा. वसमार, ता. साक्री) याच्या साक्री येथील घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केली, अशी तक्रार त्याने ०१ डिसेंबर २०२५ च्या रात्री साक्री पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
चोरट्यांनी घरातून १० तोळे ०२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि स्वयंपाकघरातील वस्तू असे एकूण रु. २,१७,०००/- किमतीचे सामान चोरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. यानुसार, साक्री पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ), ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
🕵️♂️ पोलिसांच्या तपासात 'विसंगती' उघड
गुन्हा दाखल होताच साक्री पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळाची पाहणी आणि वस्तूंची मांडणी यावरून पोलिसांना घरात काहीतरी 'असंगती' आढळली. विशेषतः, तक्रारदार भावेश नेरकर याच्या बोलण्यात व कृतीत विसंगती जाणवल्याने पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले.
सखोल तपास आणि चौकशीअंती, अखेर खुद्द तक्रारदार भावेश नेरकर यानेच आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने कट रचून स्वतःच्या घरात घरफोडीचा बनाव केल्याचे उघड झाले.
💰 चैनीपायी आणि कर्जासाठी कुटुंबाला फसवलं
पोलीस चौकशीदरम्यान भावेश नेरकर याने गुन्ह्याची कबुली दिली. भावेश हा नाशिक येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी असून, चैनीचे जीवन जगण्याच्या हव्यासापोटी तसेच कर्जाची गरज भागवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले. कुटुंबाला फसवत, घरात चोरीचा बनाव केल्याचा गुन्हा त्याने कबूल केला आहे.
🔗 ४ आरोपींना अटक, १३ लाखांचा ऐवज जप्त
या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चोरलेला संपूर्ण ऐवज जप्त केला आहे. यामध्ये बाजारभावाने रु. १३,००,०००/- किंमतीच्या १० तोळे ०२ ग्रॅम सोन्याचा समावेश आहे.
या प्रकरणात घरफोडीच्या गुन्ह्यात सामील असलेले भावेश नेरकर आणि त्याचे साथीदार यांव्यतिरिक्त, चोरीचा मुद्देमाल खरेदी करण्यात सहभागी असलेल्या एका सराफासह एकूण ०४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
🙏 उल्लेखनीय कामगिरी
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे सो., मा. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे सो., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री श्री. संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सेंट. जी. श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक, दीपक वळवी, पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड, पो कॉन्स्टेबल बापू रायते, पो. एच. के/१२६० उमेश चव्हाण, पो. के/४७७ नारायण चव्हाण, पो. के/६०९ साईनाथ पवार, पो. के/५६९ मयूर चौधरी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


Post a Comment
0 Comments