सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर:तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पिंपळनेर येथील कै. नानासाहेब साहेबराव पंडित पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पात्र ठरून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
तालुकास्तरावर ११ शाळांना मागे टाकत यश
साक्री तालुक्यातील भामेर येथील का.स. माळी माध्यमिक विद्यालयात १६ व १७ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात तालुक्यातील सुमारे ११० शाळांनी आपली नाविन्यपूर्ण वैज्ञानिक उपकरणे सादर केली होती. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेतून माध्यमिक गटात वेदांत अनिल नहीरे व दिग्विजय प्रवीण पगारे (इयत्ता ९ वी) यांनी सादर केलेल्या उपकरणाला तृतीय क्रमांक मिळाला. या यशासह त्यांची आता जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
प्रश्नमंजुषा स्पर्धेतही द्वितीय क्रमांक
विज्ञानाच्या उपकरणांसोबतच आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेतही विद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखली. यामध्ये इयत्ता १० वी मधील विद्यार्थी प्रयाग प्रशांत साळुंखे व पार्थ शरदसिंग राजपूत यांनी उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
मार्गदर्शक व मान्यवरांकडून कौतुक
या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक प्रशांत साळुंखे, दिनेश नहीरे व सचिन जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल 'विधायक समिती पिंपळनेर' संस्थेचे अध्यक्ष सुभाष दामोदर जगताप, सचिव महेंद्र रामराव गांगुर्डे व सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. पी. एल. गोयकर, उपमुख्याध्यापक ए. एम. भदाणे, सकाळ सत्र प्रमुख यू. एम. एखंडे, पुनम मराठे मॅडम आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments