सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर (वार्ताहर): शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास काय चमत्कार घडू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण पिंपळनेर तालुक्यातील देशशिरवाडे येथील सेवानिवृत्त अभियंता आणि आदर्श शेतकरी श्री. राजेंद्र शिरवाडकर यांनी घालून दिले आहे. त्यांनी चालू खरीप हंगामात स्मार्ट फार्मिंगच्या माध्यमातून मक्याचे तब्बल एकरी ६२.४१ क्विंटल विक्रमी उत्पन्न घेतले आहे. सर्वसाधारणपणे खरीप हंगामात मक्याचे एकरी २० ते ३० क्विंटल उत्पादन होत असताना, श्री. शिरवाडकर यांनी घेतलेले हे उत्पन्न कृषी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.
स्मार्ट फार्मिंग: उत्पादन खर्च कमी, उत्पन्न जास्त
स्मार्ट फार्मिंग म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिकासाठी लागणारा उत्पादन खर्च कमी करणे आणि अधिकाधिक उत्पादन घेणे होय. श्री. शिरवाडकर यांनी याच तत्त्वाचा अवलंब करत आपल्या शेतीत क्रांती केली. त्यांच्या पद्धतीत सुधारित बियाण्यांचा वापर, योग्य हवामानात पेरणी, ठिबक सिंचन, सेंद्रिय, जैविक व रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि यांत्रिकी शेती यांचा समावेश आहे.
विक्रमी उत्पादनाचे नियोजन
श्री. राजेंद्र शिरवाडकर यांनी ३० मे २०२५ रोजी ऍडव्हान्टा ७४१ या मक्याच्या वाणाची ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली होती.
* पेरणी अंतर: दोन सरीतील अंतर दोन फूट आणि दोन बियाणांतील अंतर नऊ इंच ठेवले होते.
* बेसल डोस: अत्यंत कमी प्रमाणात, फक्त दीड गोणी १०: २६ : २६ हे रासायनिक खत वापरले.
* ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून पिकाच्या वाढीनुसार वेळोवेळी खते आणि पाणी दिले. यामुळे खताच्या खर्चात मोठी बचत झाली आणि खते थेट पिकाच्या मुळाशी पोहोचली.
* सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर: त्यांनी शेतात स्वतः जीवामृत हे सेंद्रिय खत तयार करून ड्रीपद्वारे दिले. तसेच, कृभकोचे बायो फर्टीलायझर २०० लिटर पाण्यात १ लिटर या प्रमाणात ड्रीपद्वारे वापरले.
* यांत्रिकी फवारणी: अळी व कीड नियंत्रणासाठी २१ एच.पी. कुबोटा ट्रॅक्टरच्या मदतीने फवारणी करण्यात आली, ज्यामुळे मजुरी आणि औषधांच्या खर्चात बचत झाली.
एका ताटावर तीन कणसे!
वरील सर्व बाबींच्या योग्य अंमलबजावणीमुळे श्री. शिरवाडकर यांच्या ५९ गुंठ्याच्या प्लॉटमध्ये एक अभूतपूर्व बदल दिसून आला. सर्वसाधारणपणे मक्याच्या ताटास एक किंवा जास्तीत जास्त दोन कणसे येतात. मात्र, त्यांच्या प्लॉटमध्ये बऱ्याच ठिकाणी प्रत्येक मक्याच्या ताटाला एकसमान तीन-तीन कणसे आली होती आणि विशेष म्हणजे प्रत्येक कणीस शेवटच्या टोकापर्यंत दाण्यांनी पूर्ण भरलेले होते. काही ठिकाणी तर चार ते पाच कणसेही आली होती, परंतु इतर कणसांच्या पूर्ण वाढीसाठी त्यांची विरळणी करण्यात आली.
उत्पादनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास
श्री. शिरवाडकर यांनी १ गुंठे क्षेत्रातील उत्पन्नाचा शास्त्रीय अभ्यास केला.
* आद्रता सहित उत्पन्न: १ गुंठ्यात २२१.०२ किलो उत्पन्न मिळाले.
* आद्रता तपासणी: मक्याच्या दाण्यातील आद्रता मोजण्याच्या यंत्राने तपासली असता ती ४३.४० टक्के भरली.
* विक्रीसाठी स्विकार्य आद्रता: १४ टक्के.
* आद्रतेमुळे घट: २९.४ टक्के घट वजा जाता, एका गुंठ्यात १५६.०४ किलो एवढे उत्पन्न आले.
* एकरी विक्रमी उत्पन्न: या आकडेवारीनुसार, श्री. राजेंद्र शिरवाडकर यांनी मक्याचे एकरी ६२.४१ क्विंटल विक्रमी उत्पन्न घेतले आहे.
मार्गदर्शन आणि कौतुकाचा वर्षाव
या अभूतपूर्व यशासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी श्री. योगेशजी सोनवणे, मंडळ कृषी अधिकारी श्री. पी.बी. गोलाईत आणि सहाय्यक कृषी अधिकारी श्री. आर.बी. साबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, ॲडव्हान्टा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक श्री. किरण बिरारीस, एमडीओ श्री. आनंदा सावंत, अदामा कंपनीचे श्री. मनोज इंगळे, संयोग ऍग्रोचे श्री. सौरभ शिरसाट आणि बालाजी सीड्सचे श्री. प्रितेश लोखंडे यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
मंडळ कृषी अधिकारी श्री. पी.बी. गोलाईत व सहाय्यक कृषी अधिकारी श्री. आर.बी. साबळे यांनी प्रगतिशील शेतकरी श्री. राजेंद्र शिरवाडकर यांच्या मक्याच्या प्लॉटची पाहणी केली आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
श्री. राजेंद्र शिरवाडकर यांनी आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय नियोजन आणि संतुलित खत व्यवस्थापनाच्या बळावर शेतकऱ्यांसाठी एक नवीन आदर्श निर्माण केला असून, त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
Post a Comment
0 Comments