सहसंपादक अनिल बोराडे
त-हाडी (शिरपूर): शेतकऱ्यांचा 'घास' हिरावला; हाती आलेले पीक पाण्यात!
त-हाडी ता. शिरपूर: निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकरी बांधवांवर आता परतीच्या पावसाने कहर केला आहे. शिरपूर तालुक्यातील त-हाडी परिसरात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेचणीवर आलेला कपाशीचा कापूस अक्षरशः मातीत गेला आहे. शेतात पाणी साचल्याने झाडांवर राहिलेल्या बोंडांना कोंब फुटायला सुरुवात झाली असून, उन्हाळी कापसाचे पीक पूर्णपणे सडून गेले आहे.
हाती आलेला घास हिरावला
यावर्षी शेतकऱ्यांनी वातावरणातील बदलांशी लढत, मोठा खर्च करून कपाशीचे पीक वाचवले होते. पीक पूर्णपणे पक्व होऊन कापूस फुटण्यास सुरुवात झाली होती. परंतु, गणेशोत्सवात आलेल्या पावसातून सावरत नाही तोच, परतीच्या पावसाने थैमान घातल्याने हाता-तोंडाशी आलेले उत्पन्न डोळ्यादेखत पाण्यात गेले आहे.
* बोंडे सडली: शेतात पाणी साचल्यामुळे कपाशीची बोंडे मोठ्या प्रमाणात सडली आहेत आणि विषारी पावसामुळे पाने सुकण्यास सुरुवात झाली आहे.
* नुकसान शून्य: आधीच लाल्या आणि मर रोगाच्या आक्रमणामुळे झाडांची पाने गळून पडली होती. आता फुटलेला कापूस जमिनीवर पडून पाण्यात गेल्यामुळे खर्चाच्या तुलनेत उत्पन्न शून्य येणार असल्याचे चित्र आहे.
* मक्याचेही नुकसान: केवळ कापूसच नव्हे, तर काढणीवर आलेला मका खुडून शेतात पडल्यामुळे तोही सडण्याच्या मार्गावर आहे.
तातडीने पंचनाम्यांची मागणी
दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी वेचणीच्या तयारीत होते, पण मुसळधार हजेरीने त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. झालेला खर्च आणि हिरावलेले उत्पन्न पाहता शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे.
शेतकरी बांधवांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मगणी केली आहे
Post a Comment
0 Comments