सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भसह खानदेशातील उभी पिके नष्ट झाली. या नुकसानीची भरपाई म्हणून महाराष्ट्र शासनाने भारतीय किसान संघाच्या मागणीनुसार ३३ हजार कोटी रुपयांचे मोठे पॅकेज जाहीर केले. याबद्दल भारतीय किसान संघ, साक्री तालुक्याच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणारे पत्र अप्पर तहसीलदार पिंपळनेर यांना देण्यात आले.
हमीभाव केंद्राची मागणी:
सध्याच्या खरीप हंगामात मका, सोयाबीन, आणि कापूस ही पिके बाजारात येत आहेत. मात्र, स्थानिक व्यापारी कवडीमोल भावाने ही पिके खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे, भारतीय किसान संघाने पिंपळनेर येथे मका आणि सोयाबीनसाठी सरकारी हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
ही विनंती भारतीय किसान संघातर्फे अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांच्या मार्फत पणन मंत्री नामदार जयकुमार रावल आणि कृषी मंत्री नामदार दत्ता भरणे यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
कांद्याला अनुदान देण्याची मागणी:
याचबरोबर, अतिशय कमी भावाने खरेदी झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल हजार रुपये अनुदान वितरित करावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय किसान संघाचे ए.पी. दशपुते, जगदीश प्रताप गांगुर्डे, प्रकाश चिमण पाटील, सुभाष जगताप, प्रा. शिवप्रसाद शेवाळे, मंजिल शेख आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments