सहसंपादक अनिल बोराडे
निमगुळ, (प्रतिनिधी): एका बाजूला अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना, शासनाने मात्र त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याची संतप्त प्रतिक्रिया निमगुळ आणि परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शिरूड मंडळातील शिरूड, निमगुळ, धामणगाव, बोधगाव आणि बाबरे या पाच गावांना ओल्या दुष्काळाच्या यादीतून हेतुपुरस्सर वगळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट निमगुळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत सरकारच्या या 'कोरड्या' धोरणावर टीका केली.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अतिवृष्टीमुळे पिकांचे १०० टक्के नुकसान झालेले असतानाही, शासनाने केवळ कागदी घोडे नाचवून त्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे. शेतकऱ्यांनी आक्रोश करत विचारले आहे की, "या पंचक्रोशीत पाऊस झाला नाही का? आमची शेती पाण्यात गेली नाही का? मग आम्हाला वगळण्यात कोणते 'तार्किक' कारण आहे?" सरकारच्या या निर्णयामुळे 'शेतकरीविरोधी' आणि 'उदासीन' चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.
'ओला दुष्काळ त्वरित जाहीर करा!' अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात दिलीप मोरे, अजित सिंग राजपूत, युवराज राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सरकारने तात्काळ या गावांचा ओल्या दुष्काळात समावेश करून नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा, आपला लढा अधिक तीव्र करण्याची तयारी या शेतकऱ्यांनी दाखवली आहे. केवळ घोषणा करून आणि याद्या तयार करून सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असा इशाराच शेतकऱ्यांनी या आंदोलनातून दिला आहे. सरकार केवळ पाहणीचे नाटक करत आहे की खरोखर शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Post a Comment
0 Comments