सहसंपादक अनिल बोराडे
धुळे/महाराष्ट्र
संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः धुळे जिल्ह्यासह, यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीने अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत; शेती पाण्याखाली गेली आहे, तर काही ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकरी कुटुंबांपुढे त्यांच्या मुला-मुलींच्या विवाहाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे
अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय वधू-वर कक्षाने एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कक्षाचे अध्यक्ष पी.एन. पाटील यांनी दिली.
मराठा सेवा संघ शेतकऱ्यांच्या पाठीशी
शेतकऱ्यांच्या या मोठ्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन, राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर, राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय पाटील, सोपान शिरसागर, सुनील महाजन, विलास पाटील, डॉ. आर.एस. पाटील, संदीप पाटील, आमदार मंगेश चव्हाण, उद्योजक बाळासाहेब भदाणे, उद्योजक शरद पाटील आणि उद्योजक विजय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविला जाणार आहे.
सहभागी होण्यासाठी आवाहन
या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकरी कुटुंबांनी वर-वधूचे आधार कार्ड आणि जन्म तारखेचा दाखला यांसह सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी किंवा अडचणींसाठी ९४२१४३११०२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या वधू-वर पालकांनी नोंदणी केली आहे, त्यांना कुठल्याही खर्चाची झळ पोहोचणार नाही. सोहळ्याची सर्व जबाबदारी राष्ट्रीय वधू-वर कक्षाकडून पार पाडली जाणार आहे. खान्देशात नाव नोंदणीसाठी दोनशेपेक्षा अधिक प्रतिनिधी कार्यरत आहेत, तरी इच्छुकांनी तातडीने संपर्क साधावा.
सामाजिक बदलाची आवश्यकता
यावेळी बोलताना पी.एन. पाटील यांनी सामूहिक विवाह संस्था टिकवण्यासाठी आणि समाजातील समस्या कमी करण्यासाठी सामाजिक बदल आवश्यक असल्याचे नमूद केले. पालकांच्या वाढत्या अवास्तव अपेक्षांमुळे विवाहयोग्य वयात आलेल्या मुला-मुलींच्या विवाहांमध्ये विलंब होत आहे. ग्रामीण भागात अनेक युवक-युवती २८ ते ३० वर्षांपर्यंत अविवाहित राहत आहेत, ज्यामुळे मानसिक ताण, व्यसनाधीनता आणि नैराश्य वाढते आहे. समाजाने या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
घटस्फोटाचे वाढते प्रमाण आणि समुपदेशन
श्री. पाटील यांनी सोशल मीडियाच्या अतिरेक वापरामुळे पती-पत्नीत संवाद कमी होऊन अविश्वास, गैरसमज आणि ताण-तणाव वाढल्याने घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याकडेही लक्ष वेधले. या सामाजिक समस्येच्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघामार्फत समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले असून, नवदाम्पत्यांना योग्य मार्गदर्शन दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कक्षाचे पदाधिकारी शिवश्री संदीप पाटील (जिल्हाध्यक्ष), शिवश्री प्रा. डॉ. सुनील पवार (जिल्हा सचिव), शिवश्री पी.एन. पाटील (जिल्हा अध्यक्ष वधू-वर सूचक कक्ष, धुळे), कार्याध्यक्ष शिवश्री विजय ढोबळे, शिवश्री प्रा. बी.ए. पाटील (समन्वयक), शिवश्री एस.एम. पाटील (ज्येष्ठ मार्गदर्शक), शिवश्री डी.एल. पाटील (सचिव), शिवश्री रंगराव पाटील (समन्वयक), शिवश्री संजय निंबा पाटील, शिवश्री नितीन पाटील आणि शिवश्री गोकुळ देवरे हे उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments