सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर :साक्री तालुक्यातील दारखेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाळीव पशूवर हल्ले करणाऱ्या आणि लोकवस्तीत वारंवार वावरणाऱ्या एका बिबट्याला वनविभागाच्या पथकाने शिताफीने बंदिस्त केले आहे. दारखेल गावातील जनावरांच्या गोठ्यात अडकलेल्या या बिबट्याला वनविभागाने सुरक्षितपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
या भागात बिबट्याच्या वाढ
त्या संचारामुळे शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, ज्यामुळे ते शेतीत जाण्यास कचरत होते. या पार्श्वभूमीवर, पिंपळनेर प्रा. वन परिक्षेत्राद्वारे संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती मोहीम आणि आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
गोठ्यात अडकला बिबट्या, वनविभागाची तत्काळ मोहीम
दिनांक ०९.१०.२०२५ रोजी रात्री साधारण ८:०० वाजता दारखेल गावातील लोकवस्तीतील एका जनावरांच्या गोठ्यात बिबट्या अडकून पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली.
माहिती मिळताच, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. ओंकार ढोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि शिताफीने त्यांनी या बिबट्यास सुरक्षितपणे गोठ्यातून रेस्क्यू केले. सुदैवाने, बिबट्या तंदुरुस्त होता आणि त्याला लगेचच त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
यापूर्वी दारखेल परिसरात बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे वन विभागाने यापूर्वीच परिसरात पिंजरा लावला होता, तसेच कॅमेरे देखील बसवले होते. रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त झाला असावा, असे सांगण्यात येत आहे.
अधिकारी व ग्रामस्थांचे सहकार्य
धुळे वनसंरक्षक श्रीम. निनू सोमराज, उपवनसंरक्षक श्री. मो. बा. नाईकवाडी आणि सहायक वनसंरक्षक श्री. योगेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. ओंकार शं. ढोले यांच्या नेतृत्वात वनपाल श्री. रामदास चौरे, वनरक्षक श्री. अनिल घरटे, श्री. दिपक राठोड, श्री. वरूणराज माळी, श्री. अमोल पवार, श्री. राकेश पावरा, श्री. सुरेश पावरा, श्री. लखन पावरा, श्री. आकाश पावरा आणि वनमजूर श्री. मधुकर कुंवर, श्री. मोतीराम शिंदे, श्री. विक्रम अहीरे, श्री. उज्जैन चौधरी यांनी हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले.
या महत्त्वपूर्ण मोहीमेत दारखेल गावाचे सरपंच प्रभाकर भामरे, पोलीस पाटील कल्पेश भामरे यांच्यासह श्री. समाधान भामरे, श्री. हंसराज भामरे, श्री. अमोल खैरनार आणि ग्रामस्थांनी वन विभागाला सक्रिय सहकार्य केले.
साक्री तालुक्यात काही ठिकाणी अजूनही बिबट्यांचा संचार वाढला असल्याने, वनविभागाने अशा ठिकाणी योग्य उपाययोजना करून बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Post a Comment
0 Comments