सहसंपादक अनिल बोराडे
साक्री: साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील कान नदीच्या पुलावर आज सकाळी एक भीषण अपघात झाला. एका बस आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत, ज्यात दोघे गंभीर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 40 एन 9014 क्रमांकाची बस साक्रीहून पिंपळनेरकडे जात होती, तर एमएच 39 एके 8546 आणि एमएच 18 बीवाय 5437 क्रमांकाच्या दोन दुचाकी पिंपळनेरहून साक्रीकडे येत होत्या. कान नदीच्या पुलावर या तिन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.
या अपघातात लक्ष्मी दिनेश जयस्वाल (वय 12, रा. भाडणे), माधुरी दिनेश जयस्वाल (वय 40, रा. भाडणे), जयवंत दखल सूर्यवंशी (वय 35, रा. साक्री), आणि दिनेश रमेश पावरा (वय 25, रा. साक्री) हे जखमी झाले. जखमींना तात्काळ साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यातील लक्ष्मी जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. त्यांना 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने धुळे येथे पाठवण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यात सहभाग घेतला. रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेबाबत साक्री पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Post a Comment
0 Comments