संपादकीय
मुंबई: उरणमधील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात डावलले जात असल्याच्या तक्रारीनंतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदास आठवले यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले आहे. आरपीआय (आठवले) श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांच्या पुढाकाराने एका शिष्टमंडळाने मुंबईतील कलानगर येथे आठवले यांची भेट घेतली.
शिष्टमंडळाने आठवले यांना सांगितले की, उरणमधील अनेक प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी दिल्या जात नाहीत. याउलट, बाहेरील कामगारांना प्राधान्य दिले जात आहे. जेसीबी, डंपर, आरएमसी, तसेच बांधकाम साहित्य पुरवठा आणि इतर कामगार पुरवठ्याच्या कामांमध्ये स्थानिकांना डावलले जात आहे, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत रामदास आठवले यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत आदेश दिला की, "स्थानिक भूमिपुत्रांनाच कामामध्ये प्राधान्य दिले जावे." आठवले यांच्या या हस्तक्षेपामुळे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळण्याची आशा वाढली आहे.
या वेळी बोलताना तुषार तानाजी कांबळे म्हणाले, "उरणच्या भूमिपुत्रांचा रोजगार हा फक्त उदरनिर्वाहाचा नव्हे, तर त्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. रामदास आठवले साहेबांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून तातडीने कारवाई केल्यामुळे स्थानिकांना न्याय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे." त्यांनी पुढे सांगितले की, स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांचा संघर्ष सतत सुरूच राहील.
यावेळी शिष्टमंडळात महेश पाटील, संतोष लोहार, रमेश कडू, जयेश जोशी, आणि साईश कडू यांच्यासह इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments