सहसंपादक अनिल बोराडे
धुळे: शिरपूर तालुक्यातील वाडी गावात शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट देशी दारू तयार करण्याचा एक कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले असून, याप्रकरणी मुख्य आरोपी किस्मत भगवान कोळी याला अटक करण्यात आली आहे. त्याची पत्नी नीला किस्मत कोळी आणि मुलगा समाधान किस्मत कोळी हे दोघे फरार आहेत.
पोलिसांची गुप्त माहिती आणि कारवाई
दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वाडी गावात किस्मत कोळी आपल्या घरातच बेकायदेशीरपणे बनावट देशी दारू तयार करून विकत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी आपल्या टीमसह तात्काळ वाडी गावाकडे धाव घेतली.
सुमारे दुपारी 12.45 वाजता, पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन किस्मत कोळी यांच्या घरावर छापा टाकला. घराच्या मधल्या खोलीत पोलिसांना मोठ्या प्रमाणात बनावट दारू तयार करण्याचे साहित्य मिळून आले. यामध्ये अंदाजे 100 लिटर स्पिरीट, रिकाम्या प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या, बुच (झाकणे) आणि मशीनचा समावेश होता. जप्त केलेल्या या साहित्याची किंमत सुमारे 37,600 रुपये असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
आरोपीची कबुली
पोलिसांनी चौकशी केली असता, किस्मत कोळीने कबूल केले की, तो आपल्या पत्नी आणि मुलाच्या मदतीने घरातच टॅगो देशी दारू आणि संत्रा फ्लेवरची देशी दारू तयार करून गावात विकत होता. आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेली ही दारू मोठ्या प्रमाणात तयार करून विकली जात असल्याचे या कारवाईतून उघड झाले.
याप्रकरणी पोलिसांनी किस्मत कोळीला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आणले आहे. त्याच्याविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 123 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 65(क), 65(ड), 65(इ), 65(फ), 81, 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोकॉ प्रशांत पवार, पोकॉ योगेश दाभाडे, पोकॉ मनोज महाजन, पोकॉ विनोद आखडमल, पोका मनोज दाभाडे, पोकॉ भटु साळुंके आणि पोकॉ उमेश पवार यांच्या पथकाने पार पाडली. या छाप्यात पंच म्हणून प्रवीण किसन कोळी आणि गोरख रोहीदास कोळी उपस्थित होते.
या कारवाईमुळे वाडी परिसरातील बनावट दारू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
Post a Comment
0 Comments