नवापूर : 'शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन' महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'मूल्यवर्धन प्रशिक्षण ३.०' च्या तालुकास्तरीय पहिल्या टप्प्याचा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल, नवापूर येथे आयोजित या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात दहा केंद्रातील शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय श्रीमती रेखा पवार मॅडम (विस्तार अधिकारी, शिक्षण) होत्या, तर उपप्राचार्य आदरणीय श्री. नारायण मराठे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मनोगतांतून स्पष्ट झाली मूल्यशिक्षणाची गरज
प्रशिक्षणाच्या समारोपाप्रसंगी अनेक मान्यवर आणि प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात आदरणीय श्री. किशोर रायते साहेब, आदरणीय श्री. भगवान सोनवणे साहेब, श्रीम. सरला पाटील मॅडम, श्री. राजेंद्र नेरकर सर, श्रीम. कुलकर्णी मॅडम, श्रीम. ठाकरे मॅडम, महेंद्र अहिरे सर यांच्यासह सुलभक सौ. जया नेरे मॅडम, श्रीम. संगिता वसावे मॅडम, श्री. प्रताप वसावे सर, श्री. राजेंद्र गावीत सर, श्री. विवेक वाडीले सर आणि काही प्रशिक्षणार्थी शिक्षकांचा समावेश होता.
आजच्या काळात मूल्यशिक्षणाची गरज किती महत्त्वाची आहे, हे सर्वच मनोगत व्यक्त करणाऱ्यांनी सांगितले. त्यांनी प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणे, दाखले आणि अनुभव सांगत, शिक्षकांनी ही मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे कशी पोहोचवावीत, यावर प्रकाश टाकला.
विद्यार्थ्यांपर्यंत मूल्ये पोहोचवण्याचे आवाहन
प्रमुख मान्यवरांनी शिक्षकांना संबोधित करताना मोलाचे मार्गदर्शन केले. श्री. किशोर रायते साहेब, श्री. भगवान सोनवणे साहेब, श्री. नारायण मराठे सर आणि श्रीमती रेखा पवार मॅडम यांनी सर्व उपस्थित शिक्षक बंधू-भगिनींना आवाहन केले की, "या तीन दिवसीय प्रशिक्षणात आपण जे काही मूल्यशिक्षण आणि कौशल्ये आत्मसात केली आहेत, ती केवळ इथेच थांबू न देता, ती आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा." या आवाहनाला सर्व उपस्थित शिक्षकांनी एकामताने स्वीकार करत, मूल्यवर्धन कार्याचा ध्यास घेतला.
या यशस्वी समारंभाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र अहिरे सर यांनी केले, तर श्री. विवेक वाडीले सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. मूल्यवर्धन प्रशिक्षण ३.० चा हा पहिला टप्पा नवापूर तालुक्यातील शालेय शिक्षणात मूल्यांची रुजवात करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.
Post a Comment
0 Comments