Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अहिल्यानगर येथे कासार समाजाची बैठक; मराठा आरक्षणाला विरोध, स्वतंत्र आरक्षणाची मागणी

 सहसंपादक अनिल बोराडे 

अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी): मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या विरोधात मंगळवारी अहिल्यानगर येथील हॉटेल श्रद्धा येथे कासार समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मराठा समाजाला ओबीसीतून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. लवकरच या मागणीसाठी कासार समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.



या बैठकीला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, वकील तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरदराव भांडेकर, कासार विचार मंचचे गोविंद भाऊ अंधारे, प्राध्यापक सुभाषराव दगडे, संभाजीनगरचे ॲडव्होकेट अक्कर साहेब आणि नगरच्या महिला वकील श्रीमती लीना आढे यांच्यासह नाशिक, पुणे, अमरावती, परभणी, सातारा, सोलापूर, बीड, अकोला, कोल्हापूर तसेच इतर जिल्ह्यांतील कासार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आपला कोणताही विरोध नाही, मात्र त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजावर अन्याय होईल, अशी भूमिका मान्यवरांनी मांडली. ओबीसी प्रवर्गातील अनेक जाती आधीच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत आणि मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट केल्यास आरक्षणाच्या संधी कमी होतील, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.

अध्यक्ष शरदराव भांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मागणीला बळकटी देण्यासाठी आणि कासार समाजाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी लवकरच एक भव्य मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याची तारीख आणि ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल. या बैठकीत उपस्थितांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आणि समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले. या बैठकीची काही छायाचित्रेही काढण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments