सहसंपादक अनिल बोराडे
सटाणा: सटाणा येथील पोलिस सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र बागलाण अकॅडमीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार बोरसे यांनी अभ्यासिकेची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या अभ्यासिकेत सैन्यदल, पोलिस, तलाठी, ग्रामसेवक, तसेच एमपीएससी आणि यूपीएससी यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, बागलाण अकॅडमीने आजपर्यंत हजारो तरुणांना प्रशिक्षण दिले असून, ते आज देशाच्या सेवेत कार्यरत आहेत. ही संस्था युवकांना देशसेवेसाठी तयार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
उद्घाटनाप्रसंगी बोलताना आमदार बोरसे म्हणाले की, आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात अभ्यासासाठी निसर्गरम्य वातावरणात शांत आणि योग्य जागा असणे अत्यंत आवश्यक आहे. बागलाण करिअर अकॅडमीने ही गरज ओळखून बागलाणवासियांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, हे कौतुकास्पद आहे. तालुक्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शरद भामरे, अकॅडमीचे अध्यक्ष आनंदा महाले, सचिव राहुल महाले, प्रमोद सावळे, पूजा जाधव, गुलाब जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments