सहसंपादक अनिल बोराडे
नाशिक, ता. २८ जुलै, २०२५: आदिवासी बांधवांची संस्कृती जपणे, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि 'शबरी नेचुरल्स' ब्रँडचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेणे या प्रमुख उद्दिष्टांनी स्थापन झालेल्या आदि शबरी फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी पद्मश्री चैत्राम पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. आदिवासी विकास आयुक्त तथा शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी फाऊंडेशन आदिवासी संस्कृतीचे संवर्धन आणि विकास नक्कीच करेल, असा विश्वास व्यक्त केला.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या परिषद सभागृहात आयोजित संचालक मंडळाच्या पहिल्या ऐतिहासिक बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ, नवनियुक्त अध्यक्ष चैत्राम पवार, तसेच किरण पवार, प्रकाश मोंढे, छगन भुसारे, शांताराम वारे, अंकुश रन, कंपनी सचिव गणेश भदुरे, सनदी लेखापाल योगेश कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.
आयुक्त लीना बनसोड यांनी नवनियुक्त संचालक मंडळाचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि महामंडळाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ही पहिली बैठक फाऊंडेशनच्या उज्ज्वल भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असे त्या म्हणाल्या. "हा एक ऐतिहासिक क्षण असून, हळूहळू शबरी नेचुरल्स ब्रँडची जबाबदारी आदि शबरी फाऊंडेशनकडे सोपविण्याची सुरुवात या द्वारे होत आहे," अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
बैठकीत महत्त्वाचे निर्णय:
* फाऊंडेशनच्या कंपनी नोंदणी प्रमाणपत्राला मंजुरी देण्यात आली.
* चैत्राम पवार यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली.
* आर्थिक व्यवहारांसाठी बँकेत चालू खाते उघडण्यास मान्यता मिळाली, ज्याच्या संचालनासाठी अध्यक्ष आणि एका संचालकाची संयुक्त स्वाक्षरी अनिवार्य असेल.
* मेमोरंडम ऑफ असोसिएशन (MOA) आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन (AOA) मंजूर करण्यात आले.
* पहिले संचालक आणि सांविधिक लेखापरीक्षक यांची नियुक्ती झाली.
* रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (RTA) यांच्या नियुक्तीसाठी कोटेशनच्या आधारावर निर्णय होईल.
* सर्व कायदेशीर बाबींचे पालन करणे अनिवार्य असेल.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे फाऊंडेशनच्या कार्याला गती मिळेल, असे व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी नमूद केले.
'आदिवासी समाजाचे जीवनमान सुधारण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल' - पद्मश्री चैत्राम पवार
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पद्मश्री चैत्राम पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "आदि शबरीच्या संचालक मंडळाने आणि विशेषतः शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने माझ्यावर विश्वास व्यक्त करत आदि शबरी फाऊंडेशनचे पहिले अध्यक्ष म्हणून नेमणूक केली, त्याबद्दल मी आभारी आहे," असे ते म्हणाले. "आदिवासी समाजाचे खऱ्या अर्थाने जीवनमान सुधारण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. शबरी नॅचरल्स हा राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाचा पहिलाच असा ब्रँड आहे, जो आदिवासी बांधवांच्या उत्पादनांचे मूल्य वाढवत आहे आणि सोबतच संस्कृती जपत आहे. आदि शबरी फाऊंडेशन या माध्यमातून नक्कीच चांगले काम करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीमुळे आदि शबरी फाऊंडेशनच्या कार्याला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या उत्पादनांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
Post a Comment
0 Comments