सहसंपादक अनिल बोराडे
मंत्री छगनराव भुजबळ यांच्या हस्ते वितरण
पिंपळनेर, जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सितारामपूर येथील गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनीला यंदाचा प्रतिष्ठेचा "कृषि प्रेरणा पुरस्कार २०२५" प्रदान करण्यात आला. नाशिक येथे आयोजित "कृषि दिन" कार्यक्रमात, महाराष्ट्र राज्याचे नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. ना. छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते हा पुरस्कार कंपनीचे अध्यक्ष श्री. राजमल भोये यांनी स्वीकारला.
निफाड, जि. नाशिक येथील हॉटेल नक्षत्र हॉल येथे अँग्रोकेअर कृषिमंच नाशिकने "कृषि दिन", स्व. वसंतराव नाईक यांची जयंती आणि अँग्रोकेअर कृषिमंच संस्थेचा १८ वा वर्धापन दिन या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कृषि संवाद कार्यक्रम आणि १९ वा राज्यस्तरीय कृषि प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. माणुसकी फाउंडेशनतर्फे मंत्री छगनरावजी भुजबळ यांचा जाहीर नागरी सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमाला उदघाटक आणि पुरस्कार वितरक म्हणून मा. ना. श्री. छगनरावजी भुजबळ, तर अध्यक्ष म्हणून निफाडचे ज्येष्ठ नेते मा. श्री. शिवाजी दादा डेपले उपस्थित होते. तसेच, मा. श्री. शिवाजी ढवळे (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), आयोजक श्री. भूषण निकम (घेजामन, अँग्रोकेअर ग्रुप ऑफ कंपनीज, नाशिक), श्री. सागर निकाळे (माणुसकी फाउंडेशन, निफाड) आणि रोहिणी पाटील (संचालक, अँग्रोकेअर कृषिमंच नाशिक) यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनीने कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शेतकऱ्यांसाठी भाजीपाला मार्केट, धान्य खरेदी-विक्री, तसेच विधवा महिलांसाठी विविध योजना राबवणे यांसारखी सामाजिक कामे ही संस्था करत आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विधवा, अनाथ, निराधार आणि वयोवृद्ध महिलांना साडी वाटप, दिवाळीनिमित्त फराळ वाटप असे विविध उपक्रमही ही संस्था परिसरात राबवते. या सर्व कार्याची दखल घेऊन गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनीला या वर्षाचा मानाचा "कृषि प्रेरणा पुरस्कार २०२५" देऊन सन्मानित करण्यात आले.
Post a Comment
0 Comments