Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नाशिकमध्ये 'आषाढ पावसाळी साहित्य संमेलन' उत्साहात; अभिजात साहित्य निर्मितीची अपेक्षा

सहसंपादक अनिल बोराडे 

 नाशिक: साहित्य रंग साहित्य मंच नाशिक आयोजित 'आषाढ पावसाळी साहित्य संमेलन' नुकतेच आजीचे हॉटेल येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनाचे स्वागतध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी उपस्थितांकडून अभिजात आणि चांगल्या मराठी साहित्याची निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली. आपल्या ओजस्वी भाषणात टिपरे यांनी कविता म्हणजे आत्म्यातून व्यक्त होणारा हुंकार असून, मनातील भावना शब्दांतून व्यक्त झाल्यावर सर्वोत्तम कविता जन्माला येते, असे प्रतिपादन केले.



साहित्य निर्मितीची परंपरा आणि सद्यस्थिती

 यांनी केशवसूत आणि कुसुमाग्रज यांच्यासारख्या कवींच्या कवितांमधून राष्ट्रप्रेम, माणुसकी, संवेदनशीलता, सहानुभूती आणि इतिहास यांसारख्या विविध विषयांवर प्रकाश टाकला. महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतून आलेल्या कवींनी त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून नवकाव्य निर्मितीचा जो प्रयत्न केला आहे, तो अत्यंत स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले. सावरकर, लोकमान्य टिळक आणि साने गुरुजी यांचे साहित्य प्रतिकूल परिस्थितीतही प्रभावी ठरले, तर आज सर्व साहित्य उपलब्ध असताना अधिक प्रभावी आणि उत्तम साहित्याची निर्मिती होण्याची अपेक्षा सुहास टिपरे यांनी व्यक्त केली.

सन्मान आणि सत्कार

या कार्यक्रमाला भीमाबाई जोंधळे (अध्यक्ष), डॉ. प्रतिभा देशमुख (चौरे) आणि आशा बिरारी पाटील (प्रमुख अतिथी) उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमाताई बागुल यांनी केले. याप्रसंगी सौ. सुनंदा साहेबराव पाटील यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून "समाज रत्न पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कवींच्या कवितांनी संमेलन अधिकच रंगतदार बनवले. सर्व सहभागी कवींना शिल्ड आणि सन्मानपत्र देऊन त्यांच्या काव्य प्रतिभेचा सन्मान करण्यात आला. खुशी मोरे हिला तिच्या शैक्षणिक यशाबद्दल सन्मानित करण्यात आले.

आयोजकांचे कौतुक आणि कवी संमेलनाचा निकाल

सलग तीन कवी संमेलनांचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल आयोजक सुशीलकुमार शिंदे यांचा सर्व अतिथींच्या हस्ते शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. सुशीलकुमार शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. मराठी भाषेविषयी तळमळीने कार्य करणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांचे उपस्थित प्रत्येक कवीने अभिनंदन केले.

या कवी संमेलनातील विशेष बाब म्हणजे सहभागी कवींमधून उत्कृष्ट असे क्रमांक काढण्यात आले, त्याचे निकाल खालीलप्रमाणे आहेत:

 * प्रथम क्रमांक: माणिकराव गोडसे

 * द्वितीय क्रमांक: यश सोनार

 * तृतीय क्रमांक: सोनाली चव्हाण

 * चतुर्थ उत्तेजनार्थ क्रमांक: कावेरी मदने

 * विशेष क्रमांक: प्रतिभा देशमुख/चौरे

Post a Comment

0 Comments