सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर,= छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, पिंपळनेर मंडळातर्फे काल सायंकाळी छत्रपती शिवाजी चौक (पाटील गल्ली) येथे जोरदार जल्लोष करण्यात आला. पालकमंत्री मा.ना. जयकुमार भाऊ रावल आणि जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे यांच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फटाके फोडून आणि पेढे वाटून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'मोदी सरकार जिंदाबाद', 'फडणवीस सरकार जिंदाबाद' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने शिवरायांच्या या ऐतिहासिक किल्ल्यांना जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
युनेस्कोच्या यादीतील १२ किल्ले आणि त्यांचे महत्त्व
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 'अद्वितीय वैश्विक मूल्य' म्हणून समाविष्ट झालेल्या या १२ किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ले - रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, तसेच तामिळनाडूतील एक किल्ला - जिंजी यांचा समावेश आहे. युनेस्को ही संस्था जगभरातील ऐतिहासिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करते.
या किल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा मिळाल्याने त्यांचे महत्त्व जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास संपूर्ण जगाला ज्ञात होईल आणि जगभरातून पर्यटक या किल्ल्यांना भेट देण्यासाठी आकर्षित होतील. याशिवाय, युनेस्कोकडून या १२ किल्ल्यांच्या शास्त्रीय संवर्धनासाठी तांत्रिक आणि आर्थिक मदत मिळेल. जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि पर्यटकांची संख्या वाढल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टी पिंपळनेर मंडळ, युवा मोर्चा, शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केले होते. हा ऐतिहासिक निर्णय छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला जागतिक पातळीवर घेऊन जाणारा असून, यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Post a Comment
0 Comments