सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर, १८ जुलै २०२५: आपल्या देशाच्या संरक्षण दलातील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी दरवर्षी ७ डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त विविध संस्थांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येते. याच आवाहनाला प्रतिसाद देत पिंपळनेर येथील कर्मा. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाने सैनिक कल्याण निधीसाठी १०,०००/- (दहा हजार) रुपयांचे योगदान दिले आहे.
धुळे जिल्हाधिकारी आणि धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दरवर्षी धुळे येथे सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो. या दिनाचा मुख्य उद्देश देशाच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांच्या कल्याणासाठी निधी उभारणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांच्या पाल्यांना उत्तम शिक्षण घेता यावे यासाठी मदत करणे हा आहे. ध्वज निधीचे संकलन करून सैनिकांप्रति अभिमान व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, पिंपळनेर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी संकलित केलेली ही रक्कम काल, १७ जुलै २०२५ रोजी धुळे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू पवार यांच्या हस्ते ही रक्कम प्रदान करण्यात आली.
यावेळी धुळे येथील जिल्हा सैनिक अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी माहिती दिली की, प्रत्येक संस्था, शाखा आणि संघटनांनी आपल्या क्षमतेनुसार थोडा का होईना निधी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी देऊन या कार्यात योगदान देणे हे देशाच्या हिताचे आहे. राष्ट्रप्रेम आणि निष्ठेपोटी देशातील प्रत्येक संस्थेने ध्वज दिन निधी संकलनात सहभागी होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. हाच दृष्टिकोन समोर ठेवून आदिवासी भागातील पिंपळनेर वरिष्ठ महाविद्यालयाने या मोहिमेत आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
Post a Comment
0 Comments