सहसंपादक अनिल बोराडे
शिरपूर, मोबाईल हॅक करून खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या भीतीपोटी, तालुक्यातील ताजपुरी येथे एका २० वर्षीय बी. फार्मसीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर (२०) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने केवळ परिसरातच नव्हे, तर शैक्षणिक वर्तुळातही मोठी खळबळ उडाली असून, सायबर गुन्हेगारीचा वाढता धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थाळनेरजवळ असलेल्या ताजपुरी गावातील सनेर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा असलेल्या किशनने सोमवारी दुपारी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी उपचारापूर्वीच किशनचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने सनेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, काही अज्ञात सायबर गुन्हेगारांनी मृत किशनचा मोबाईल हॅक करून त्यातील काही खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. ही बाब किशनच्या लक्षात आल्यानंतर त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला. समाजात आपली बदनामी होईल या भीतीने आणि या प्रकारामुळे आलेल्या नैराश्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे. सोशल मीडियावर खासगी माहिती व्हायरल होण्याच्या भीतीने एका तरुणाने आपले जीवन संपवल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेची थाळनेर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी शत्रुघ्न पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "मोबाईल हॅक केल्याची माहिती समोर आली असून, त्या दिशेने अत्यंत गांभीर्याने तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आणि दोषींना शोधून काढण्यासाठी किशनचे काही निकटवर्तीय आणि मित्र यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच, तपासासाठी किशनचा मोबाईल देखील ताब्यात घेण्यात आला असून, सायबर तज्ञांच्या मदतीने त्याची सखोल तपासणी केली जाईल."
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांपासून सावध राहावे आणि कोणतीही संशयास्पद लिंक किंवा मेसेज आल्यास त्यावर क्लिक करू नये. तसेच, जर कोणाचा मोबाईल हॅक झाला असेल किंवा खासगी माहिती व्हायरल होण्याची भीती असेल, तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. थाळनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, लवकरच यामागील सत्य उघड होईल अशी अपेक्षा आहे.
Post a Comment
0 Comments