सहसंपादक अनिल बोराडे
नंदुरबार: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत विद्यार्थी विकास विभागाने नंदुरबार तालुका विधायक समितीच्या जी.टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील ६५ विद्यार्थ्यांना एकूण ३ लाख २७ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरित केले आहे.
या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड करताना विद्यापीठाने आर्थिक उत्पन्न, दिव्यांगत्व, निराधार असणे आणि आई-वडील नसणे यांसारखे निकष लावले होते. या निकषांच्या आधारे पात्र ठरलेल्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना हे अनुदान देण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम.जे. रघुवंशी आणि संस्थेचे समन्वयक डॉ. एम.एस. रघुवंशी यांच्या हस्ते लाभार्थी विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. एस.पी. पाटील, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री. सुदेश रघुवंशी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रुपेश देवरे, महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संगीता पिंपरे, सहायक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. विलास पाटील आणि लेफ्टनंट डॉ. विजय चौधरी उपस्थित होते.
या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. एम.जे. रघुवंशी यांनी सांगितले की, महाविद्यालय नेहमीच विद्यापीठाच्या आणि इतर योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असते. आर्थिक सहाय्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या मदतीमुळे त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास मोठा हातभार लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Post a Comment
0 Comments