नाशिक: वृद्धाश्रम ही केवळ एक सोय नसून, ते समाजाचे अपयश आहे, असे परखड मत सौ. शामल योगेंद्र पाटील यांनी नाशिक येथे व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तके मित्र मंडळात डॉ. अतुल गवांदे यांच्या 'बीईंग मॉर्टल' या पुस्तकावर बोलताना त्यांनी हे विचार मांडले.
सौ. शामल पाटील यांनी पुढे सांगितले की, असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्ण आणि वृद्धांना केवळ वैद्यकीय उपचार पुरेसे नसतात, तर त्यांना मायेच्या मदतीचा हातही आवश्यक असतो. मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य असून, त्याचा स्वीकार करण्याची मानसिक तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. समाजातील आणि कुटुंबातील वृद्धांची सेवा करणे, तसेच त्यांना उर्वरित आयुष्य सुख-समाधानाने जगण्यासाठी मदत करणे हे नव्या पिढीचे कर्तव्य असल्याचे आवाहन सौ. पाटील यांनी यावेळी केले.
"वृद्धाश्रम ही सोय नाही, तर सामाजिक अपयशाची साक्ष आहे. आपण, समाज म्हणून याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे," असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाची सुरुवात पुस्तक मित्र मंडळाचे प्रमुख मंगेश मालपाठक यांच्या स्वागत आणि प्रास्ताविकाने झाली. समिती सदस्य सुहास टिपरे यांनी सौ. शामल पाटील यांचा परिचय करून दिला. जयेश बर्वे यांनी आभार प्रदर्शन केले, तर डॉ. लक्षुमीकांत भट यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, पदाधिकारी संजय करांजकर, सोमनाथ मुठाळ, देवदत्त जोशी आणि जयेश बर्वे उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments