सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर-सटाणा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G च्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून पिंपळनेरमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मा. अप्पर तहसीलदार, पिंपळनेर, श्री. शेजूळ साहेब यांना एक निवेदन दिले असून, रस्ता दुरुस्त करण्याची आणि संबंधित ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, हा रस्ता एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाला असला तरी, अवघ्या 25 ते 30 दिवसांतच त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. यावरून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्ट होते. पिंपळनेर-सटाणा नागरी भागातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले होते. अनेक आंदोलने आणि दोन वेळा आमरण उपोषणानंतर हे काम सुरू झाले. मात्र, ज्या एजन्सीला हे काम देण्यात आले, त्यांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराची परिसीमा गाठल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या परिपत्रकानुसार काम झालेले नाही. जे काम एक महिनाभरही टिकू शकले नाही, याचा अर्थ ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. शिवसेना पदाधिकारी आणि पिंपळनेरकर नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की, या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून ठेकेदाराला शासनाच्या काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि त्याचा ठेका काढून घेण्यात यावा. तसेच, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना शिवसेना धुळे जिल्हा समन्वयक किशोर आप्पा वाघ, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक अलकाताई जाधव, आरपीआय आठवले गट आदिवासी आघाडी राज्याध्यक्ष श्री. संदीप देवरे, शिवसेना पिंपळनेर तालुकाप्रमुख तुषार गवळी, शिवसेना पिंपळनेर शहरप्रमुख महेश (टिनू) वाघ, युवासेना उपतालुका प्रमुख चिंतामण ठाकरे, महिला आघाडी शहर संघटिका अर्चनाताई चव्हाण, युवासेना पिंपळनेर युवा अधिकारी मयूर नांद्रे, उपशहर प्रमुख बाबा शेख, अशोक सोनवणे सर, गंगाधर शिंदे, संदीप बोरसे, सागर जगताप, अमित शिरसाठ, अशोक बीरारीस, शिवा पाटील, प्रदीप घाणेकर, आदी शिवसैनिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments