संपादकीय
नाशिक, 26 जून 2025: नासिमनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल, नाशिक यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक सुहास हरिश्चंद्र टिपरे यांना प्रतिष्ठेचा "जीवन गौरव पुरस्कार 2025" जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या साहित्य आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाची ही दखल आहे.
संस्थेच्या संस्थापिका सौ. मेघा शिंपी, कार्याध्यक्षा सौ. मंजू जाखडी आणि महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष श्री. अनिल नहार यांनी संयुक्तपणे या पुरस्काराची घोषणा केली. वयाच्या पन्नाशीनंतर विविध क्षेत्रांत, विशेषतः सामाजिक, आध्यात्मिक, सांप्रदायिक, आरोग्य, पत्रकारिता, लेखन आणि कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुरुषांना हा 'जीवन गौरव' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
येत्या 29 जून 2025 रोजी नाशिक येथे एका भव्य समारंभात सुहास टिपरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि मानाचा फेटा बांधून गौरवण्यात येणार आहे. गेल्या 45 वर्षांपासून त्यांनी वृत्तपत्रांमधून केलेली साहित्य सेवा आणि समाजसेवा या पुरस्काराद्वारे अधोरेखित होणार आहे.
सुहास टिपरे यांनी 'आई' हे गाजलेले पुस्तक लिहिले असून, त्याला गिरणा गौरव प्रतिष्ठानचा 'स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्कार' मिळाला आहे. त्यांचे 10 प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सार्वजनिक वाचनालय, वसंत व्याख्यानमाला, इंद्रकुंड जीर्णोद्धार समिती, पंचवटी पोलीस शांतता समिती, ब्राह्मण संस्था अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी भरीव कार्य केले आहे.
यापूर्वीही त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात सन्मानित वृत्तपत्र लेखक संघटनांचा 'गोदा रत्न पुरस्कार', बाबाज थिएटरचा 'कृतज्ञता पुरस्कार', ज्ञान सिंधू प्रकाशनचा 'साहित्य रत्न पुरस्कार', येवला येथील 'तात्या टोपे पुरस्कार', 'लोकमान्य टिळक पुरस्कार', मुंबईचा 'मानव सेवा पुरस्कार', आणि काळीज साहित्य संस्था, संभाजीनगरचा 'जीवन गौरव पुरस्कार' यांचा समावेश आहे.
हा सोहळा 29 जून रोजी नाशिक येथील के.के. वाघ कॉलेज समोर, पवार गार्डन येथे संपन्न होणार आहे. सुहास टिपरे यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Post a Comment
0 Comments