सहसंपादक अनिल बोराडे
मनुमानसी महिला बहुउद्देशीय संस्था व महावीर इंटरनॅशनल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सोहळ्यात, ज्येष्ठ साहित्यिक गावगाडाकार खांदेशभूषण कवी लेखक संपादक तात्यासो. साहेबराव नंदन यांना साहित्य, नाट्य आणि कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी चौथा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. २९ जून २०२५ रोजी नाशिक येथे होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
![]() |
साहेबराव नंदतात्या |
हा जीवन गौरव पुरस्कार ५० वर्षांवरील व्यक्तींना विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जातो, ज्यात सामाजिक, आध्यात्मिक, सांप्रदायिक, आरोग्य संवर्धन सेवा, पत्रकारिता, कवी, लेखक, संपादक इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे.
पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, बुके, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह आणि मानाचा फेटा असे आहे. संस्थेच्या संस्थापिका मेघाताई शिंपी आणि इतर मान्यवरांच्या नामनिर्देश असलेले निवडपत्र तात्यासाहेबांना प्राप्त झाले आहे.
मूळचे बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील रहिवासी असलेले साहेबराव नंदन तात्या सध्या उद्योगानिमित्त नाशिक येथे स्थायिक आहेत. ते उत्तर महाराष्ट्रात साहित्यसेवेत लोकप्रिय असून, उत्तम विचारांचे प्रवचनकार, नाट्यलेखक, कवी, कादंबरीकार आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे 'गावगाडा' काव्यसंग्रह, 'परिसस्पर्श' कादंबरी, 'सगर रत्न अंक', 'सगर सेवार्थी विशेषांक', 'सगर दिपोत्सव दिवाळी अंक', 'स्नेहबंध अंक' यांसारखे साहित्य प्रकाशित झाले असून, त्यांच्या सर्वच साहित्याला विविध संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना सन्मानाने विविध पुरस्कारांनी गौरविले असून ते शेकडो सन्मानपत्रांचे मानकरी ठरले आहेत.
वयाच्या बासष्ठव्या वर्षी त्यांना हा चौथा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने सगर साहित्यिक परिवार आणि साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Post a Comment
0 Comments