Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुळ्यात मोठी कारवाई: ३०,००० रुपयांची लाच घेताना 'दलाल' रंगेहाथ

 सहसंपादक अनिल बोराडे 

धुळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धुळ्यात एका मोठ्या लाचखोरीचा पर्दाफाश करत, जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ३०,००० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संबंधित कामांसाठी लाच मागितल्याचा आरोप असलेल्या वाल्मीक प्रताप सिंग झाल्टे (राजपूत) याला एसीबीने सापळा रचून ताब्यात घेतले.



काय आहे प्रकरण?

४७ वर्षीय तक्रारदारांनी त्यांच्या नातू आणि नातीच्या 'भामटा राजपूत' जातीच्या जात प्रमाणपत्रांसाठी उपविभागीय अधिकारी, धुळे यांच्याकडे ऑनलाइन अर्ज केला होता. तब्बल सहा महिने उलटूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने, तक्रारदार आणि त्यांचे भाचे मनोज पवार यांनी ३० मे २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात धाव घेतली. तिथे त्यांची भेट आरोपी वाल्मीक प्रताप सिंग झाल्टे याच्याशी झाली.

झाल्टेने तक्रारदारांना सांगितले की, उपविभागीय कार्यालयात त्याचे सर्वांशी चांगले संबंध आहेत आणि प्रत्येक जात प्रमाणपत्रासाठी १५,००० रुपये याप्रमाणे एकूण ३०,००० रुपये द्यावे लागतील. 'प्रांत साहेब, नायब तहसीलदार संजय शिंदे आणि कार्यालयातील कर्मचारी हे माझ्याकडून सदरचे पैसे घेऊन तुमचे काम करून देतील; ते प्रत्यक्ष तुम्हाला भेटणार नाहीत,' असे सांगून त्याने लाचेची मागणी केली होती.

एसीबीची यशस्वी सापळा कारवाई

तक्रारदारांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दिली. या तक्रारीची गंभीर दखल घेत, एसीबीने २ जून २०२५ रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली. या पडताळणीत आरोपी वाल्मीक प्रताप सिंग झाल्टे याने तक्रारदाराच्या नातूंच्या भामटा राजपूत जातीच्या प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकारी आणि नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्याकरिता ३०,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

अखेरीस, धुळे रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

तपास पथक

या यशस्वी सापळा कारवाईचे पर्यवेक्षण श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग, धुळे (मो. न. ९४०३७४७१५७, ९८३४२०२९५५) यांनी केले.

सापळा आणि तपासाची जबाबदारी रूपाली खांडवी, पोलीस निरीक्षक, ला.प्र.विभाग, धुळे (मो. नं. ८३७९९६१०२०) यांनी सांभाळली.

सापळा पथकात पो.हवा. राजन कदम, पो. कॉ. प्रशांत बागुल, पो. कॉ. रामदास बारेला, आणि चालक पो. कॉ. जगदीश बडगुजर यांचा समावेश होता, जे सर्व ला.प्र.वि. धुळे युनिट येथे नेमणुकीस आहेत.

Post a Comment

0 Comments