सहसंपादक अनिल बोराडे
धुळे: माजी खासदार डी. एस. अहिरे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) घड्याळात प्रवेश केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत साक्रीतून काँग्रेसचे तिकीट निश्चित असतानाही धुळे जिल्ह्यातील भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांवर दबाव आणून आपले तिकीट कापले, असा आरोप अहिरे यांनी केला आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदाराचा प्रचार करूनही त्यांनी आपल्या नावाची शिफारस केली नाही, त्यामुळे काँग्रेसमध्ये आपल्याला रस उरला नसल्याचं अहिरे यांनी सांगितलं. त्यांच्या या प्रवेशामुळे साक्री तालुक्यात आता घड्याळाची 'टिकटिक' वाजणार असून, मोठे राजकीय बदल अपेक्षित आहेत आणि तालुक्यातील समीकरणेही बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस सोडण्यामागची खदखद आणि अजित पवारांसोबतची नवी सुरुवात
अहिरे यांनी काँग्रेस सोडण्यामागचं कारण स्पष्ट करताना सांगितलं की, "मी काँग्रेस पक्षाचा सच्चा पाईक होतो. मी आमदारकीसाठी उभा असतानाही तालुक्यातील काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये राहूनही माझ्या विरोधात उघड प्रचार करत अपक्षाला मदत केली." त्यांनी पुढे म्हटले, "मी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार गोवाल पाडवींना पूर्ण मदत केली, तसेच विधानसभेतही काँग्रेसला मदत केली. मात्र, मला २०२४ ला काँग्रेसचे तिकीट निश्चित असतानाही जिल्ह्यातील दोन भाजपच्या बड्या नेत्यांनी माझे तिकीट कापण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विद्यमान खासदारांनी माझ्या नावाची साधी शिफारस केली नाही, त्यामुळे मला आता काँग्रेसमध्ये रस उरला नव्हता."
डी. एस. अहिरे यांनी आपल्या राजकीय प्रवासात शरदचंद्र पवार यांनी आपल्याला राजकारणात आणल्याचं आणि दहा वर्षे अजित पवारांसोबत विधानसभेत काम केल्याचं सांगितलं. त्यांचे मार्गदर्शन लाभल्याने आणि त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे आपण यशस्वी झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. आता अजित पवारांच्याच नेतृत्वात आपला राजकीय प्रवास सुरू ठेवणार असून, आदिवासी भागात राष्ट्रवादीचे काम भक्कमपणे उभे करेल. नव्हे तर, अजित पवारांच्या माध्यमातून विकासाचे पर्व सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डी. एस. अहिरे: एक अनुभवी प्रशासक आणि लोकप्रतिनिधी
डी. एस. अहिरे यांचा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव मोठा आहे. त्यांनी १९९३ ते ९७ पर्यंत प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी म्हणून काम केले आहे. जानेवारी १९९८ मध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षातर्फे खासदार म्हणून निवडणूक लढवली आणि मताधिक्याने विजयी झाले. त्यावेळी ते १३ महिने खासदार होते.
त्यानंतर सरकार कोसळल्यानंतर त्यांनी साक्री तालुक्यात आमदारकी लढवली आणि १९ हजार मतांनी विजयी झाले. २०१४ ते २०१९ पर्यंत त्यांनी पुन्हा आमदारकी लढवून विद्यमान आमदार मंजुळा गावित यांचा ३५०० मतांनी पराभव करून ते निवडून आले होते. २००१ ते २००३ पर्यंत ते नाशिक माढा बोर्डाचे चेअरमन होते, तर २००३ ते २००४ पर्यंत राज्य नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली.
अहिरे यांच्या पत्नी कुसुमताई अहिरे या २०१९ ते २०२३ पर्यंत आदिवासी पश्चिम पट्ट्यातील कुडाशी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच होत्या, तर मुलगा धीरज अहिरे यांच्या माध्यमातून २०१९ ते २०२५ पर्यंत जिल्हा परिषदही ताब्यात घेतली. प्रशासकीय कामाच्या अभ्यासातून त्यांनी पांझरा नदी, कान नदी आणि जामखेडी नदीवर अनेक पूल बांधून दोन गावांना जोडले. तसेच, त्यांनी मोठ्या गावांची विभागणी करून ४२ स्वतंत्र महसूल गावे केली. त्यांच्या या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला साक्री तालुक्यात फायदा होऊन राजकीय गणिते बदलतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Post a Comment
0 Comments