Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ॲट्रॉसिटी कायदा समाजातील दरी कमी करण्यासाठी प्रभावी: न्या. प्रवीण कुलकर्णी

सहसंपादक अनिल बोराडे 

 धुळे येथे अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

धुळे, समाजातील जातीय सलोखा वाढवण्यासाठी आणि जाती-जातींमधील दरी कमी करण्यासाठी ॲट्रॉसिटी कायदा (अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा) अत्यंत प्रभावी असल्याचे मत धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी व्यक्त केले. धुळे येथे आयोजित एक दिवसीय अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ व सुधारित अधिनियम २०१६ संदर्भात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी म्हणाले की, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा जलदगतीने निकाल लागावा यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याची, तसेच हे खटले चालवण्यासाठी विशेष सहायक सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. ज्या पक्षकारावर अन्याय झाला आहे, त्याला गुणवत्तेवर न्याय मिळाला पाहिजे, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. पीडितांना मोफत सल्ला देण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुक्याच्या ठिकाणी तालुका विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या कायद्याच्या तरतुदींचा समाजात मोठ्या प्रमाणावर प्रभाव असून, त्याचा वचक सामाजिक तत्वांवर कायम राहण्यासाठी कायद्याच्या तरतुदींची सक्तपणे अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजात जाती-जातींमधील दरी कमी करण्यात आपण यशस्वी झालो, तर या कायद्याचा उद्देश सफल होईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.



या कार्यशाळेस पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीष जाधव, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मानसिंग पावरा, अभियोग संचालनालयाचे अतिरिक्त संचालक ॲड. बी. डी. भोईटे, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. गणेश पाटील, तज्ञ व्याख्याता सुभाष केकाण, विधीतज्ञ ॲड. गायत्री वाणी, सहायक लोक अभिरक्षक ॲड. भाग्यश्री वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अभियोग संचालनालयाचे अतिरिक्त संचालक ॲड. बी. डी. भोईटे आणि तज्ञ व्याख्याते सुभाष केकाण यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते निवासी शाळेतील शुभांगी रुपनर, नेहा बाचकर, कावेरी पालवी, विकास साळवे या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेस वकील वर्ग, पोलीस व महसूल अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, समता दूत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments