सहसंपादक अनिल बोराडे
नंदुरबार: अजिंठा फिल्म सोसायटी आणि देवगिरी चित्र साधना यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या 'नंदग्राम' शॉर्ट फिल्म फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात झालेल्या या महोत्सवात शहरातील नाट्य व चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
महोत्सवाचा थाटामाटात शुभारंभ
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवतेकर, उपाध्यक्ष अनिल भोळे, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, देवगिरी चित्र साधनाचे प्रांत संयोजक किरण सोहळे आणि प्रा. संतोष सोनवणे हे व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचा यथोचित सत्कारही करण्यात आला.
प्रास्ताविकात किरण सोहळे यांनी फेस्टिव्हलमागील भूमिका स्पष्ट केली. उद्घाटनपर भाषणात डॉ. शेवतेकर यांनी नंदुरबारच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकत सांगितले, "बोलीभाषा, लोककला आणि भारतीय मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम असून, सर्व कलाकारांनी एकत्र येणे काळाची गरज आहे."
चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
यानंतर देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल अंतर्गत निवडण्यात आलेल्या तीन उत्कृष्ट लघुपटांसह कँपस फिल्म्स, बाल चित्रपट आणि योफिमा शिष्यवृत्ती योजनेतील कलाकृतींचे स्क्रिनिंग करण्यात आले. सामाजिक, सांस्कृतिक व विचारप्रवर्तक विषयांवर आधारित या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अभिषेक राजपूत यांनी नंदुरबारमधील सक्रिय कलाकारांचा परिचय करून दिला आणि “आम्ही सर्वजण चित्रसाधनेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊ,” असा मनोदय व्यक्त केला.
नंदुरबारला 'चित्रनगरी' बनवण्याचे ध्येय
समारोप सत्रात डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी सांगितले की, "भारतीय दृष्टिकोनातून चित्रपट निर्मिती, मूल्यसंवर्धन आणि युवकांसाठी व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. नंदनगरीची ओळख भविष्यात चित्रनगरी म्हणून निर्माण व्हावी यासाठी चित्रसाधना कटिबद्ध आहे." कार्यक्रमाच्या अखेरीस जितेंद्र खवळे यांनी आभारप्रदर्शन करत, "प्रत्येक महिन्यात लघुपट स्क्रिनिंगचे आयोजन आणि स्थानिक चित्रपट महोत्सव नंदुरबारमध्येच घेण्याचा मानस आहे," असे स्पष्ट केले.
ज्येष्ठ लेखक प्रा. प्रभाकर भावसार, प्रख्यात रंगकर्मी रवी डी. जोशी आणि माजी नगरसेवक निलेश पाडवी यांची विशेष उपस्थिती लाभली, ज्यामुळे महोत्सवाला विशेष उंची लाभली.
यशस्वी आयोजनासाठी परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक भटु चौधरी, सहसंयोजक जितेंद्र खवळे, प्रचारप्रमुख संजय कासोदेकर, तसेच रणवीर अनंत, विजय माळवे, कुणाल वीर, कामिनी भोपे, डॉ. खुशाल राजपूत, ऋषिकेश मंडलिक, अरुण सोनार, संजय वानखेडे यांनी मोलाचे योगदान दिले.
Post a Comment
0 Comments