सहसंपादक अनिल बोराडे
धुळे, दि. ३० एप्रिल: धुळे पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई करत अवैधपणे सुपारीची वाहतूक करणाऱ्या सात वाहनांना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की काही वाहनांमधून अवैध सुपारीची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
पोलिसांनी कर्नाटक राज्याच्या पासिंगची सहा मालवाहू वाहने (क्रमांक KA-14C-3378, KA-14C-7305, KA-14C-5646, KA-14C-5287, KA-14C-5614, KA-14/C-3090) आणि गुजरात राज्याच्या पासिंगचे एक वाहन (क्रमांक GJ-33/T-5999) अडवले. तपासणीमध्ये या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात सुपारीचा साठा आढळला. विशेष म्हणजे, या मालाच्या वाहतुकीसंबंधी चालकांकडे कोणतेही वैध कागदपत्रे उपलब्ध नव्हते.
पोलीस उपनिरीक्षक अमोल मोरे आणि त्यांच्या टीमने ही यशस्वी कारवाई केली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हे सर्व चालक नागपूर येथून सुपारी घेऊन भरुचमार्गे गुजरातच्या दिशेने जात होते. पोलिसांनी त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ दिला, परंतु ते आवश्यक कागदपत्रे दाखवू शकले नाहीत.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. जप्त केलेल्या सुपारीच्या मालाची पाहणी आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी करणार आहेत. त्यानंतर या मालाची किंमत निश्चित केली जाईल आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
धुळे पोलिसांनी केलेली ही कारवाई अवैध वाहतूक करणाऱ्यांवर एक मोठी जरब निर्माण करणारी आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Post a Comment
0 Comments