साक्री शहराच्या विविध भागांमधून नागरिकांना विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्या वारंवार निर्माण होत आहेत विद्युत पुरवठा कमी दाबाने होत आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक पातळीवर या समस्यांची सोडवणूक होत नसल्याने स्थानिक नागरिक तसेच साक्री तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, तालुका कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, साक्री शहराध्यक्ष सचिन सोनवणे व साक्री नगरपंचायतीच्या नगरसेविका श्रीमती नर्गिसबी याकूब खॉं पठाण, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागर देसले या पदाधिकारींनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ऍडवोकेट गोवाल पाडवी यांच्याकडे लेखी गाऱ्हाणे मांडले. लोकांच्या समस्यांची दखल घेऊन एडवोकेट गोवाल पाडवी यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सचिव व सदस्य यांना साक्री शहरात नवीन १०० के.व्ही. क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविण्याबाबत कार्यवाही करण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्या पत्रानुसार साक्री शहरातील रुपाई नगर, भाडणे रोड, पोळा चौक, भारती नगर, मुकुंद नगर, बाबा आमटे आश्रम शाळा, शिवाजीनगर, विद्यानगर, गजानन कॉलनी, रामदेवबाबा नगर तसेच डॉ. देसले दवाखाना अशा विविध भागांमधील रोहित्र १०० के.व्ही. क्षमतेचे बसविण्याबाबत उल्लेख केला आहे. पत्रात नमूद स्थळांवर नवीन विद्युत रोहित्र बसविण्यासाठी मंजुरी देऊन जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातही सूचना केली आहे. सदर पत्राची प्रत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे धुळे अधीक्षक अभियंता यांनाही पाठविण्यात आली असल्याचे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी सांगितले.
दरम्यान तापमानाचा पारा मागील काही दिवसांपासून खूपच वाढला असताना साक्री शहरामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित केला होत आहे. यामुळे तापमान वाढीने आधीच हवालदिल झालेले नागरिक उकाड्याच्या समस्यांनी त्रस्त झाले आहेत. पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने घरातील विविध विद्युत उपकरणे पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत किंवा नादुरुस्त होत आहेत. ठराविक वेळेनंतर वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी स्थानिक कार्यालयाला येथील नागरिक करत आहेत. मात्र अतिरिक्त भार वाढल्याने व मागील काही दिवसांपासून साक्रीत हवेचा दबाव वाढल्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे कारण दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासाठी अधिक क्षमतेचे रोहित्र संपूर्ण साक्री शहरात बसविणे आवश्यक झाले आहे. लोंबकळत्या तारांची उंची वाढवणे ही महत्त्वाचे आहे साक्री शहरात लोककल्याणकारी विकासकामांतर्गत संपूर्ण रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी डांबर रस्ता तर काही ठिकाणी 'पेव्हर ब्लॉक' बसविण्यात आले आहेत. यामुळे रस्त्याची उंची वाढली असून विजेच्या दोन खांबामध्ये जोडलेल्या तारा मात्र जमिनीपासून बारा ते पंधरा फूट आणि काही ठिकाणी आठ ते दहा फुटांपर्यंत खाली आल्या आहेत. यामुळे विजेचा शॉक लागून अप्रिय घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून पावसाळ्यापूर्वी खाली लोंबकळणाऱ्या तारांची उंची वाढवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
Post a Comment
0 Comments